नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : व्यक्तीमत्व विकासात शारीरिक आरोग्य अत्यंत महत्वाचे आहे. आपल्या शरीरातील विविध इंद्रिय संस्था सुरळीतपणे कार्य करतात तेव्हा आपले आरोग्य चांगले आहे असे आपण म्हणतो. परंतु धुम्रपान, तंबाखू सेवन व मद्यपान यासारख्या घातक सवयी आरोग्यास बिघडवितात. शाळेत जाणाऱ्या १५ टक्के कुमारवयीन मुलांना तंबाखूचे व्यसन असल्याचे वास्तव पुढे आल्याने शाळाच तंबाखू मुक्त करण्याचा उपक्रम शासनाकडून राबविला जात आहे. यांतर्गत, गोंदिया जिल्ह्यातील १६५३ पैकी १५१९ शाळा तंबाखू मुक्त झाल्या आहेत.गोंदिया जिल्ह्यातील १६५३ शाळा तंबाखू मुक्त करण्याचा माणस शिक्षण विभागाचा आहे. या तंबाखू मुक्त शाळांसाठी शासनाने ११ निकष ठेवले आहेत. त्या निकषांची पुर्तता करून त्याची माहिती अॅपवर अपलोड करून आपल्या शाळेला तंबाखू मुक्त शाळा घोषीत करण्याच्या स्पर्धेत या सर्व शाळा आहेत. जिल्ह्यातील १६५३ शाळांपैकी १५१९ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १३४ शाळांना तंबाखू मुक्तीचा ध्यास आहे. यात आमगाव तालुक्यातील १५० शाळा, देवरी तालुक्यातील २०६ शाळा, सडक-अर्जुनी तालुक्यातील १६३ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून त्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला आहे.तिरोडा तालुक्यातील २०२ शाळांपैकी १८७ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १५ शाळांना तंबाखू मुक्त शाळेची प्रतीक्षा आहे. सालेकसा तालुक्यातील १४८ शाळांपैकी १३६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १२ शाळांना तंबाखू मुक्त शाळेची प्रतीक्षा आहे. गोरेगाव तालुक्यातील १५८ शाळांपैकी १४० शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून १८ शाळांना तंबाखू मुक्त शाळेची प्रतीक्षा आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील २११ शाळांपैकी १८६ शाळा तंबाखू मुक्त झाल्या असून २५ शाळांना तंबाखू मुक्त शाळेची प्रतिक्षा आहे.दरवर्षी जगात जवळ-जवळ ६४ लाख लोक तंबाखूमुळे मरण पावतात. सन २०३० पर्यंत जगात तंबाखूने मरणाऱ्यांची संख्या वर्षाकाठी ८० लाख होणार आहे. भारतात दररोज दोन हजार ५०० लोकांचा तंबाखूने मृत्यू होतो. वर्षाकाठी १० लाखांहून अधिक लोक तंबाखूने एकट्या भारतात मरण पावतात. तंबाखू मुळे होणाऱ्या तोंडाच्या कर्करोगाचे सर्वाधीक रूग्ण भारतात आहेत.इंटरनॅशनल एजंसी फॉर रिसर्च ऑन कॅन्सर आणि जागतिक आरोग्य संघटनेनुसार धुम्रपानात चार हजारांहून अधिक रसायन असल्याचे सांगण्यात आले. धुम्रपानात ८० आणि धुम्ररहित तंबाखू पदार्थात २८ कर्कजन्य रसायने असतात. कोणताही प्राणी तंबाखूची पाने खात नाही. सापही तंबाखूच्या शेतात जात नाही. तरीही सर्वात सुज्ञ समजला जाणारा मनुष्य तंबाखूचे सेवन करून स्वत:चेच जीवन नरकमय बनवित आहे.या तंबाखूच्या व्यसनापासून उद्याची पिढी म्हणजे किशोरवयीन मुले व शिक्षकांना यापासून दूर ठेवण्यासाठी शासनाने शाळेत आता तंबाखू मुक्त शाळा अभियान राबविणे सुरू केले आहे. या अभियानाला यशस्वी करण्यासाठी गोंदिया जिल्ह्याचा संपूर्ण शिक्षण विभाग कामाला लागला आहे.तंबाखूमुळे होणारे दुष्परिणामतंबाखू सेवनामुळे अनेक दुष्परिणाम होतात. केसांना दुर्गंध येते. तोंडाची दुर्गंधी, दात सडतात, हिरड्यांना इजा होऊन दात निकामी होतात. त्यांची मजबूती नष्ट होते. दातांवर चॉकलेटी-पिवळे डाग पडतात. वास घेण्याची क्षमता कमी होते. चेहºयावर सुरकुत्या पडतात. शरीरात अशक्तपणा जाणवतो. हाडे ठिसूळ होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ लागते. डोळ्यांमध्ये जळजळ होत डोळ्यातून पाणी येते. निकोटीनच्या प्रभावामुळे मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम होतो. विचार करण्याची क्षमता कमी होते. चित्त एकाग्र करणे कठीण जाते. तंबाखूमुळे तोंड, स्वरयंत्र, फुप्फुस, गळा, अन्ननलीका, मूत्राशय, मूत्रपिंड, नाक, पोट, गर्भाशय व मुखाचा कॅन्सर होतो. गँगरिन, क्षयरोग, दमा, हृदयविकार, उच्च रक्तदाब, लकवा, मधूमेह, मोतीबिंदू होते. पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होत जाते व पुरूष नपुंसक बनतो. ज्या स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी होते व त्यांना वंधत्व येते.
तंबाखू सोडण्यासाठी हे करातंबाखू सोडण्याचा विचार करणाºया व्यक्तींनी तंबाखू सोडण्याच्या तारखेची घोषणा आपल्या कुटुंबीय, नातलग किंवा मित्रांसमोर करावी, तंबाखूसाठी प्रवृत्त करतील अशा लोकांपासून दूर रहावे, तंबाखू सेवनाची इच्छा झाल्यास १ ते १०० अंक मोजावे, धावा किंवा दोरीवरील उड्या घ्याव्या, प्राणायाम, कुरमुरे, चणे, शेंगदाणे, बडीशेप या पदार्थाचे सेवन करावे. तंबाखू सेवनाने शरीरात अस्तित्वात असणारी विषारी रसायने शरीरातून बाहेर टाकण्यासाठी जास्तीतजास्त पाणी प्यावे. तसेच योग्य मित्रांसोबत आपले विचार व भावना शेअर कराव्यात.तंबाखू आणि धुम्रपानात आढळणारी जीवघेणी रसायने- निकोटीन : हे नशा आणणारे रसायन आहे. शरीरात निकोटीनचे प्रमाण कमी झाल्यावर व्यक्ती बेचैन होते, अस्वस्थता वाढते आणि त्यामुळे व्यक्तीला पुन्हा-पुन्हा तंबाखू सेवन करण्याची इच्छा होते.- हाईड्रोजन सायनाईट: विषगृहात प्रयोगात येणारा विषारी वायू असतो.- अमोनिया : फरशी व स्वच्छतागृहे इत्यादी स्वच्छ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव्यातील रसायन तंबाखूमध्ये असतो.- आर्सेनिक: मुंग्यांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या द्रव्यातील विषारी रसायन- नेप्थेलीन : कापडातील किटाणूंना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यात असणारे रसायन.- कॅडमियम : कारच्या बॅटरीत आढळणारे रसायन.- अॅसीटोन: भिंतीवरील रंग काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्याद्रव्यातील रसायन.- कार्बन मोनोक्साईड : कारच्या धुरातील विषारी वायू.- डीडीटी : किड्यांना मारण्यासाठी वापरात येणारे रसायन.- बुटेन : इंधन म्हणून वापरात येते.