सडक अर्जुनी : पोलीस स्टेशन डुग्गीपारतर्फे वीर बिरसामुंडा बलिदान दिनानिमित्त ग्राम मोगर्रा येथे बुधवारी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा १६० नागरिकांनी लाभ घेतला.
वीर बिरसामुंडा बलिदान दिवसानिमित्त व नक्षलग्रस्त अतिदुर्गम भागात नक्षल चळवळीला आळा बसविण्याच्या उद्देशाने शासकीय विभागामार्फत विविध उपक्रम राबवून नक्षलग्रस्त भागातील नागरिकांशी जास्तीत जास्त समन्वय साधता येईल, याकरिता पाेलीस अधीक्षक विश्व पानसरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर घेण्यात आले. आरोग्य शिबिरामध्ये गावातील लोकांची वैद्यकीय तपासणी व कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करुन जनजागृती करण्यात आली. शिबिरात १२० लोकांनी प्रतिसाद देऊन तपासणी केली .४० नागरिकांचे कोविड लसीकरण करण्यात आले. एकूण १६० नागरिकांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. डाॅ. विकास विंचूरकर, आरोग्य सेवक, सेविका, गावातील आशा वर्कर यांनी शिबिरात सेवा दिली. सरपंच मोहन सुरसाऊत, माजी उपसरपंच अरुण लेदे, लेखलाल टेकाम, सुरेश बोरकर, माजी पोलीसपाटील शालीकराम पटले, डुग्गीपारचे ठाणेदार सचिन वांगडे, सपोनि. संजय पांढरे, पो. उपनि. विनोद भुरले व पोलीस अंमलदार उपस्थित होते.