गोंदिया : नव वर्षाची सुरुवात जिल्हावासीयांसाठी कोरोना संक्रमणाच्या दृष्टीने चांगली झाली म्हटल्यास वावगे होणार नाही. नववर्षाच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्ण वाढीला पूर्णपणे ब्रेक लागला आहे. मंगळवारी (दि.१९) जिल्ह्यात १७ बाधितांनी कोरोनाने मात केली तर १६ नवीन रुग्णांची भर पडली आहे.
जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याने आता जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या १६९ वर आली आहे. त्यामुळे जिल्ह्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ६०२६० जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले. त्यापैकी ४८७४६ नमुने निगेटिव्ह आले आहे. तर कोरोना बाधित रुग्णांचा त्वरित शोध घेण्यासाठी रॅपिड अँटीजन टेस्ट केली जात आहे. याअंतर्गत ६३३१६ जणांचे स्वॅब नमुने तपासणी करण्यात आले त्यापैकी ५७२६३ नमुने निगेटिव्ह आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १४०५३ कोरोना बाधित आढळले असून यापैकी १३७०३ जणांनी मात केली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १६९ कोराेना ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. २ स्वॅब नमुन्यांचा अहवाल प्रयोगशाळेकडून प्राप्त व्हायचा आहे.