पं.स. भ्रष्टाचार प्रकरण : भ्रष्टाचाराची रक्कम वाढण्याची शक्यतासडक अर्जुनी : येथील पंचायत समितीमधील लिपीक सुनील पटले यांनी केलेल्या सुमारे एक कोटी रूपयांच्या भ्रष्टाचारप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या दोन गटशिक्षणाधिकारी व दोन बँक व्यवस्थापकांना येथील न्यायालयाने १७ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे येथील शिक्षण विभाग व बँकेतील कर्मचाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचायत समितीत कार्यरत लिपीक पटले यांनी ६३ लाखांची अफरातफर केल्याची तक्रार शिक्षण विभागाकडून पोलिसांत करण्यात आली. यात पोलीस व शिक्षण विभागाकडून करण्यात आलेल्या चौकशीत पटले यांनी ९९ लाख ४४ हजार रूपयांचा भ्रष्टाचार केल्याचे दिसून आले. त्यामुळे पटले यांच्यावर गुन्हा नोंद झाला. परंतु पटले यांना उच्च न्यायालयातून जामिन मिळाल्याने त्यांना अटक होऊ शकली नाही. शिक्षक संघटनांनी केलेल्या तक्रारीमुळे व जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीने उचललेल्या प्रकरणामुळे चौकशीचे वारे वाहू लागले. चौकशीत को- आॅपरेटिव्ह बँकेचे व्यवस्थापक सुनील हिरामण राऊत (५०), गटशिक्षणाधिकारी मुनेश्वर लक्ष्मण मेश्राम (४७), तत्कालीन गटशिक्षणाधिकारी त्र्यंबक माणिकराव सोयाम व को-आॅप. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक बी.एम. मडपे यांना चौकशीत घेऊन डुग्गीपारच्या पोलीस निरीक्षकांनी २० शिक्षकांचे बयान घेतले. खोटे चेक व खोट्या सह्या यासंदर्भात चौकशी करून चौघांवर भादंविच्या कलम ४०६, ४०८, ४०९, ४२०,३४ अंतर्गत गुन्हा नोंद करून शनिवारी न्यायालयात हजर केले. यावर दिवानी न्यायाधीश व्ही. साठे यांनी त्यांना येत्या १७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (तालुका प्रतिनिधी)
गटशिक्षणाधिकारी व बँक व्यवस्थापकांना १७ पर्यंत कोठडी
By admin | Published: June 13, 2016 12:11 AM