कपिल केकत
गोंदिया : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे गरजेचे असतानाही जिल्ह्यातील तब्बल १,७९,३३५ नागरिकांनी त्यांच्या दुसऱ्या डोसची मुदत संपूनही अद्याप डोस घेतला नसल्याची बाब उघडकीस आली आहे. यात कोविशिल्डचे ८६,६०२ तर कोवॅक्सिनचे ९२,७३३ लाभार्थी आहेत. यावरून जिल्हावासी दुसऱ्या डोसला घेऊन चांगलेच बेफिकीर असल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाला मात देण्यासाठी देशात ४-५ लसींना परवानगी देण्यात आली आहे. मात्र जिल्ह्यात सुरुवातीपासूनच कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड या दोनच लसींचे डोस दिले जात आहेत. विशेष म्हणजे, कोरोनापासून बचावासाठी या दोन्ही लसींचे प्रत्येकाला दोन डोस घेणे गरजेचे आहे व तसे सुरुवातीपासूनच तज्ज्ञ सांगत आले आहेत. मात्र त्यानंतरही कित्येक नागरिक भीती व लसीला घेऊन संभ्रमामुळे लस घेणे टाळत आहेत. तर लसीचा एक डोस घेतल्यानंतर आता दुसऱ्या जोसची गरजच काय, असा बेफिकीरपणा दाखवून डोस घेत नसल्याचे दिसून येत आहे. मुदत संपूनही दुसरा डोस न घेणाऱ्या नागरिकांची आकडेवारी बघितल्यास तब्बल १,७९,३३५ नागरिकांचा यात समावेश आहे. त्यातही कोविशिल्डचे ८६,६०२ तर कोव्हॅक्सिनच्या ९२,७३३ लाभार्थ्यांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसल्याचे दिसून येत आहे. जिल्हा लसीकरणात अग्रेसर असून, लसीकरणाला घेऊन उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. असे असताना नागरिकांकडून मात्र लस घेण्यात दुर्लक्षितपणा केला जात असल्यास कोरोनाला मात कशी देणार, यावर विचार करण्याची गरज आहे.
------------------------------------
आठ लाख नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्याने सुरुवातीपासूनच लसीकरणात चांगली कामगिरी केली असून, राज्यात अव्वल राहिला आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यात आतापर्यंत ८,००,६१५ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये ६,१३,३२३ नागरिकांनी पहिला डोस तर १,८७,२९२ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. १,७९,३३५ नागरिकांनी दुसरा डोस घेतला नाही ही बाब गंभीर आहे. मात्र दोन्ही डोस घेतल्याशिवाय कोरोनापासून पूर्णपणे संरक्षण मिळत नसल्याने प्रत्येकाने लवकरात लवकर दुसरा डोस घेणे गरजेचे आहे.
----------------------------
लसीकरणात तरुणांचीच आघाडी
कोरोना लसीकरणात जेव्हापासून १८-४४ गटाला परवानगी देण्यात आली आहे तेव्हापासून तरुणांचा हा गट लसीकरणात आघाडीवर आले. आकडेवारीनिहाय बघितल्यास १८-४४ गटातील ३,२३,५७३ तरुणांनी लस घेतली आहे. तर ४५-६० वयोगटातील २,७८,१०८ नागरिकांनी तसेच १,४५,५१२ ज्येष्ठ नागरिकांनी लस घेतली आहे. एकंदर लसीकरणाला घेऊन तरुणाईच जास्त सजग असल्याचे दिसत आहे.