कपिल केकत, गोंदिया : इयत्ता बारावीच्या परीक्षेला २१ फेब्रुवारीपासून सुरूवात झाली असतानाच आता शुक्रवारपासून (दि.१) इयत्ता दहावीच्या परिक्षेला सुरूवात होत आहे. जिल्ह्यातून दहावीच्या परीक्षेला १८ हजार ६०३ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. परीक्षेला घेऊन जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून तयारी पूर्ण झाली असून बारावीच्या परीक्षेनुसारच दहावीच्या परीक्षेवरही पूर्ण नजर ठेवली जाणार आहे. परीक्षेत अनुचित प्रकार घडू नये, विद्यार्थ्यांना शांततेत पेपर सोडविता यावे, या उद्देशाने शिक्षण विभागाने नियोजन केले असून, प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. तसेच परिक्षा केंद्र परिसरात १०० मिटर अंतरात प्रवेशबंदीही राहणार आहे. जिल्हयात ९८ केंद्रांवर दहावीची परिक्षा घेतली जाणार असल्याची माहिती माध्यमिक उपशिक्षणाधिकारी ज्ञानेश्वर दिघोरे यांनी दिली आहे.
यंदा दहावी आणि बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे. कॉपीबहाद्दरांची कसलीही गय करण्यात येणार नाही. यात केंद्रांवर होणारे गैरप्रकारावरही नियंत्रण मिळविण्यात येणार असून, बारावी सोबतच दहावीच्या इंग्रजी आणि गणिताच्या पेपरचे चित्रीकरण करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.भरारी पथकात जिल्हाधिकारी, सीईओ आणि एस.पी.
- परीक्षा कॉपीमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी केंद्रनिहाय बैठे पथकही असणार आहे. त्याशिवाय दोन भरारी पथकही राहणार आहेत. एका पथकात जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, डाएट प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी (योजना) यांच्यासह महिला अधिकारी. तसेच दुसऱ्या पथकात तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि जि.प. विभाग प्रमुख असतील.
दहावीच्या परीक्षेला प्रविष्ठ विद्यार्थी- १८,६०३
दहावीच्या परीक्षेसाठी केंद्र - ९८