गोंदिया : जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून २ जण ठार तर दोन मजूर महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२१) दुपारच्या सुमारास सडक अर्जुनी, तिरोडा व देवरी तालुक्यात घडली. ओमदास सखाराम वाघाडे रा. घाटबोरी, ता. सडक अर्जुनी व ललिता कैलास राऊत (३५) रा. शिलापूर, ता. देवरी असे वीज पडून मृत्यू झालेल्यांची नाव आहे. तर गायत्री दिनेश ठाकरे (३०), फुलन ईशू ठाकरे (३२) रा. सर्रा, ता. तिरोडा असे वीज पडून जखमी झालेल्या महिलांची नाव आहे.
जिल्ह्यात दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाली. सध्या खरीप हंगामातील रोवणीचे काम सुरु असल्याने शेतकरी आणि मजूर वर्ग शेतात असतात. सडक अर्जुनी तालुक्यातील घाटबोरी येथील ओमदास वाघाडे यांच्या शेतात शुक्रवारी रोवणीचे काम सुरु होते. दरम्यान दुपारच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. शेतात काम करीत असलेल्या ओमदास वाघाडे यांच्या अंगावर वीज कोसळली. यात त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
दुसरी घटना देवरी तालुक्यातील शिलापूर येथे घडली. शेतात रोवणीचे काम करीत असताना ललिता कैलास राऊत (३५) या मजूर महिलेच्या अंगावर वीज कोसळल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना दुपारच्या सुमारास घडली. तर तिसरी घटना तिरोडा तालुक्यातील सर्रा येथे घडली. शेतात रोवणीचे काम करीत असलेल्या दोन महिलांवर वीज कोसळल्याने त्या जखमी झाल्याची घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. शेतात उपस्थित शेतकऱ्यांनी या दोन्ही जखमी महिलांना वडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. दरम्यान या दोन्ही महिलांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. दरम्यान दोन्ही घटनांची नोंद महसूल विभागाने केली आहे.