सात लाखांचे काम झाले : बांद्या बिघडल्याची शेतकऱ्यांची ओरडकाचेवानी : काचेवानी व बरबसपुरा येथे भातखाचरचे काम करण्यात आले. २७ लाखापैकी फक्त ७ लाखांचे काम करून २० लाखांचा अपहार करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे. या प्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी होत आहे. काचेवानी येथील भातखाचरचे काम ९ लाख रुपयाचे तर बरबसपुरा येथील काम १८ लाख रुपयाचे करायचे होते. हे काम मजूरांच्या माध्यमातून करायचे होते. परंतु मजूरांना काम न देता ट्रॅक्टरच्या सहाय्याने हे काम करण्यात आले. एका हेक्टरमध्ये ८ ते १० तासापेक्षा अधिक काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून करण्यात आले. एका दिवसात ४० ते ५० आर जमिनीत माती काम करायला पाहिजे होते. परंतु ट्रॅक्टरच्या माध्यमातून १६० ते २०० आर मातीचे काम करण्यात आले. एका ट्रॅक्टरने सरासरी १० तास काम केले. त्याची मजूरी प्रति तास ६०० रु. प्रमाणे देण्यात आले. या दोन्ही गावात तयार करण्यात आलेल्या भातखाचरचे काम फक्त १० दिवसाच्या आत करण्यात आले. ज्या ठिकाणी शेकडो मजूराना महिना-दिड महिना मजूरी मिळू शकत होती. त्यांना मजूरी न मिळू देता हे काम ट्रॅक्टरच्या माध्यमातून काम करण्यात आले. परिणामी मजूरांना काम मिळाले नाही. या प्रकारात कृषी सहायक यांचा हात असल्याचा आरोप सरपंच ममता लिचडे, थानसिंग गौतम, मानिकलाल कटरे, सदाशिव कटरे, अशोक लिचडे, नेतराम माने, बिसेन, उके, कटरे यांनी केला आहे. या भातखाचरच्या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
भातखाचरच्या कामात २० लाखांचा अपहार?
By admin | Published: August 02, 2015 2:01 AM