गोंदिया : यंदा डासजन्य आजारांनी जिल्हावासी बेजार झाले असून, मलेरिया अन् डेंग्यूने कहर केला आहे. विशेष म्हणजे, डेंग्यू जोमात पाय पसरत असून, त्यातही गोंदिया तालुक्यात जास्त प्रादुर्भाव दिसून येत आहे.सप्टेंबर महिन्यातील २० दिवसांत २० रुग्ण आढळले असून, आठ महिन्यांत तब्बल ५३ रुग्ण निघाले आहेत. यामुळे तालुकावासीयांना जरा जास्त खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळ्यात डास व जलजन्य आजार फोफावत असून, यामुळेच पावसाळ्याला आजारांचा काळ म्हटले जाते. यंदा डोळ्यांची साथ पसरली. त्यानंतर आता ताप व टायफॉइडच्या साथीने जिल्हावासी बेजार झाले आहेत. मात्र, यावरच जिल्हावासीयांच्या मागचे ग्रहण सुटले नसून, मलेरिया व डेंग्यूने जरा जास्तच पाय पसरले आहेत. जिल्ह्यात जानेवारीपासून बघितल्यास आतापर्यंत मलेरियाचे २१३ रुग्ण आढळून आले असून, डेंग्यूचे १४० रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये लक्ष देण्यासारखी बाब म्हणजे, मलेरियाचा प्रकोप ग्रामीण भागात दिसून येत असतानाच डेंग्यूने मात्र गोंदिया शहर व तालुक्याला जास्त प्रमाणात झपाटल्याचे दिसून येत आहे.
जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत गोंदिया तालुक्यातील ३३ रुग्ण आढळून आले असून, सप्टेंबर महिन्यात २० तारखेपर्यंत २० रुग्ण आढळून आले आहेत. म्हणजेच, गोंदिया तालुक्यात डेंग्यूचे तब्बल ५३ रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील एकूण १४० रुग्णांमध्ये गोंदिया तालुक्यात ५३ रुग्ण असल्यामुळे डेंग्यूच्या डासांनी तालुक्यालाच झपाटल्याचे दिसून येत आहे.
पाणी साचू देऊ नका
- डेंग्यूचे डास स्वच्छ पाण्यात तयार होत असून, यासाठीच पावसाळ्यात पावसाचे पाणी जास्त दिवस साचून राहू देऊ नका, असे आरोग्य विभागाकडून सांगितले जाते. मात्र, त्यानंतरही याकडे शहर व तालुकावासी दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्ट दिसून येते. कारण गोंदिया शहरात आतापर्यंत १६, तर तालुक्यातील ग्रामीण भागात ३७, असे एकूण ५३ रुग्ण आढळून आले आहेत. यामुळेच पाणी साचून राहू न देणे, हाच एकमात्र महत्त्वाचा उपाय आहे.
२० सप्टेंबरची तालुकानिहाय रुग्णसंख्या
तालुका- रुग्ण
गोंदिया- १४
तिरोडा- ०६
आमगाव- ०२
गोरेगाव- ११
देवरी- ०३
सडक-अर्जुनी- ०६
सालेकसा- ०५
अर्जुनी-मोरगाव- ०७
गोंदिया शहर- ०६
तिरोडा शहर- ०१
-२० सप्टेंबरपर्यंत- ६१
- जानेवारी ते ऑगस्ट- ७९
- गोंदिया शहर- १६
- गोंदिया तालुका- ३७