लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू असल्याने नदी नाले भरुन वाहत आहे. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने पुजारीटोला, कालीसरार, संजयसरोवर धरणाचे दरवाजे उघडण्यात आले. तर वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शनिवारी (दि.२९) याचा नदी काठालगतच्या २० गावांना फटका बसला. त्यामुळे या गावातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरू केले आहे.गोंदिया तालुक्यातील कोरणी, कासा, कंटगटोला, भद्याटोला, जिरुटोला, डांगोर्ली काटी या गावांमध्ये वैनगंगा आणि बाघ नदीचे पाणी साचल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शनिवारी पहाटेपासूनच वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गावांमध्ये पाणी साचण्यास सुरूवात झाली. दरम्यान पाणी पातळीत वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूच्या मदतीने येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले होते.गोंदिया तालुक्यातील कोरणी येथील ८ नागरिकांना तसेच तिरोडा तालुक्यातील ढिवरटोला येथील १०६ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम युध्द पातळीवर सुरू करण्यात आले होते. कोरणी, डांगोर्ली, जिरूटोला, भद्याटोला या गावांमध्ये पुराचे पाणी साचल्याने अनेक घरे अर्धी बुडाली आहेत. त्यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.संततधार पावसामुळे जिल्ह्यातील पांजरा-भोसा, कामठा-नवरगावकला, चांदोरी खुर्द-बघोली, आमगाव-किडंगीपार, आमगाव-कामठा हे मार्ग अद्यापही बंद आहेत. सिंचन प्रकल्पाचे पाणी सोडण्यात आल्याने नदी नाले भरुन वाहत असल्याने हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.नदी काठालगताच्या गावांना सर्तकतेचा इशारामध्यप्रदेशातील संजय सरोवर धरणाच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असल्याने शनिवारी (दि.२९) सकाळी या धरणाचे १० दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे बाघ आणि वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठालगतच्या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे. तसेच हवामान विभागाने पुढील चौवीस तासात जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्हा प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे.इटियाडोह ओव्हर फ्लोच्या मार्गावरजिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या पावसामुळे सिंचन प्रकल्पातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. अजुर्नी मोरगाव तालुक्यातील नवेगाबांध जलाशय ओव्हर फ्लो झाला तर इटियाडोह धरण ओव्हर फ्लोच्या मार्गावर आहे. शनिवारी तिरोडा तालुक्यातील चोरखमारा जलाशय ओव्हर फ्लो झाला. तर जिल्ह्यातील सर्वच प्रमुख सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा ८० टक्यांवर आहे.
गोंदिया जिल्ह्यात २० गावांना पुराचा वेढा; दोनशेवर नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2020 2:42 PM
वैनगंगा आणि बाघ नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने शनिवारी (दि.२९) याचा नदी काठालगतच्या २० गावांना फटका बसला. त्यामुळे नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या चमूने सुरू केले आहे.
ठळक मुद्देअनेक मार्ग अजूनही बंद