लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : घरी आलेल्या पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला विशेष सत्र न्यायालयाने २० वर्षांचा सश्रम कारावास व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही सुनावणी प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी सोमवारी (दि. २१) केली. तौसिफ शेख ईसाख शेख (२३, ता. अर्जुनी-मोरगाव) असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे
१५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी २ वाजता पीडित पाच वर्षीय चिमुकली अंगणवाडीतून घरी परत आल्यानंतर नात्याने मामा लागत असलेल्या आरोपी तौसिफ शेख याच्या घरी गेली होती. यावेळी आरोपी बाथरूममध्ये आंघोळ करीत होता. पीडिता त्याच्या जवळ गेली असता आरोपी तौसिफने तिच्यावर अत्याचार केला. पीडितेला असहनीय वेदना झाल्या. शेतातून कामावरून घरी परतल्यानंतर ३ वाजता तिने आईला घडलेल्या घटनेबाबत सविस्तर सांगितले. यावर पीडितेच्या आईने १७ सप्टेंबर २०२२ रोजी केशोरी पोलिसात आरोपीविरुद्ध तक्रार दिली असता पोलिसांनी आरोपीविरुद्ध भादंवि कलम ३७६ (अ, ब), ५०६, सहकलम ६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अन्वये गुन्हा नोंद केला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संदीप इंगळे यांनी केला होता.
सात साक्षीदारांची नोंदविली साक्ष दोष सिद्ध करण्यासाठी सरकार-पीडित पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील वसंत चुटे व कृष्णा पारधी यांनी एकूण सात साक्षीदारांची साक्ष व इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासमोर सादर केले. एकंदरीत आरोपीचे वकील व पीडितेचे सरकारी वकील चुटे यांच्या सविस्तर युक्तिवादानंतर प्रमुख जिल्हा व विशेष सत्र न्यायाधीश वानखेडे यांनी आरोपीविरुद्ध सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी तौसिफ शेख याला शिक्षा सुनावली.
अशी सुनावली शिक्षा भारतीय दंड विधान कलम ३७६ (अ) (ब) अंतर्गत २० वर्षांचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास, कलम ५०६ अंतर्गत दोन वर्षांचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, न भरल्यास दोन महिन्यांचा अतिरिक्त कारावास, कलम ०६ बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ अंतर्गत २० वर्षाचा सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंड, न भरल्यास चार महिन्यांचा अतिरिक्त कारावास असा २० वर्षाचा सश्रम कारावास व एकूण १२ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
११ हजार रुपये पीडितेला देण्याचे आदेश दंडाच्या एकूण रकमेपैकी ११ हजार रुपये एवढी रक्कम पीडितेला देण्याचे आदेश देत सानुग्रह अनुदानाकरिता योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. या प्रकरणात पोलिस अधीक्षक गोरख भामरे यांच्या मार्गदर्शनात, पोलिस निरीक्षक गणेश वनारे यांच्या देखरेखीत, पोलिस पैरवी कर्मचारी पूनम ठाकरे यांनी काम पाहिले.