गोंदिया : दिवसेंदिवस वातावरणात बदल घडून येत आहे, ग्लोबल वॉर्मिंगचे संकेत मिळत आहेत. यासाठी विविध प्रकारचे प्रदूषण कारणीभूत आहे. प्रदूषणावर नियंत्रण मिळवून, उत्तम आरोग्य व निरोगी जीवन, इंधन बचत तसेच सायकल चालवून आपली रोगप्रतिकारशक्ती देखील वाढवू शकतो असा संदेश देण्यासाठी येथील युवकांनी ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम सन २०१७ पासून सुरू केला. रविवारी (दि.१६) या उपक्रमाला २०० आठवडे झाले आहेत.
सन २०१७ पासून जेसीआई गोंदिया राईस सिटी व आज फोरम यांच्या संयुक्तवतीने ‘एक दिन सायकल के नाम’ हा उपक्रम शहरातून सुरू करण्यात आला. प्रत्येक रविवारी १५ ते २० किलोमीटर सायकल चालवून शहरातील नागरिकांना निरोगी जीवन व प्रदूषणमुक्तीचा संदेश देण्यात येत आहे. याच उपक्रमातील दोन युवक अमन व शांती हे प्रदूषणमुक्त भारताचा संदेश घेऊन तब्बल हजारो किलोमीटरचा प्रवास करून बाघा बॉर्डर-जम्मू काश्मीर पर्यंत पोहचले. या अभियानाचे महत्व बघून उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
याच उपक्रमातील अशोक मेश्राम हे २५०० किलोमीटर सायकल चालवून मुंबईला गेले होते. त्यांचाही यावेळी स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या उपक्रमात ७४ वर्षीय धावक मुन्नालाल यादव देखील जुळले असून त्याचा देखील स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी ' एक दिन सायकल के नाम ' चे सदस्य व सायकलिस्ट कार्यक्रमाला उपस्थित होते.
आता जॉबला सायकलने जाते
‘एक दिन सायकल के नाम’ या उपक्रमात २४ नोव्हेंबर २०१९पासून जोडली गेल्यावर मी प्रत्येक रविवारी सायकलिंग करत आहे. या आधी मी जॉबला गाडीने जायची. मात्र, आता मागील एक वर्षापासून सायकलने जॉबला जात आहे. कारण यामुळे मला दोन फायदे होत आहेत. पहिला फायदा म्हणजे माझा फिटनेस राखला जात आहे व दुसरा फायदा म्हणजे मला आता गाडीत पेट्रोल भरण्याचे पैसेही लागत नाहीत. म्हणून सगळ्यांनी सायकल चालवावी, हाच संदेश मी देत आहे.
- कल्याणी गाडेकर, सायकलिस्ट