गोंदिया : येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात चाकू घेऊन प्रवेश करणाऱ्या ३५ वर्षांच्या आरोपीने एका वकिलाच्या ॲटर्नीला चाकूने मारून धमकावीत त्याच्याजवळून २ हजार रुपये हिसकाविले. ही घटना ३१ मे रोजी सकाळी ११:३० वाजता घडली. पिंटू श्रीवास्तव (३५, रा. गोविंदपूर, गोंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
गोंदिया तालुक्यातील रावणवाडी येथील दीपक छगनलाल हरीणखेडे (वय ३०) हे गोंदियातील एका वकिलाकडे ॲटर्नी म्हणून काम करतात. नेहमीप्रमाणे ते गोंदिया न्यायालयाच्या आवारात सकाळी १०:३० वाजता आले. आपले काम करीत असताना सकाळी ११:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी पिंटू श्रीवास्तव याने चाकू घेऊन न्यायालयाचे आवार गाठले. चिखलोंढे ॲटर्नी कुठे आहे? असे दीपक हरीणखेडे यांना विचारले.
दीपकच्या मागे ते बसत असल्याने त्याने मागे बसत असतात, असे सांगितले. त्यावेळी चिखलोंढे ॲटर्नी नव्हते. त्यांचा मुलगा मागे बसला होता. पिंटू श्रीवास्तव याने चिखलोंढे यांच्या मुलाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यावेळी दीपक हरीणखेडे पाणी पीत असताना त्याने कमरेत खुपसलेला चाकू काढून दीपकच्या डोक्यावर मारला. त्याच्या जवळून दोन हजार रुपये व मोबाइल हिसकावून घेतला. घाबरलेला दीपक धावत पोलिस बसलेल्या मुख्यद्वाराकडे गेला. पोलिसांना बोलावून आणले. पोलिस शिपाई वैद्यक यांनी त्याच्याजवळील चाकू पकडून आरोपीलाही पकडले. आरोपीवर गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३९४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक सागर पाटील करीत आहेत.
न्यायालयाच्या आवारात हल्ल्याची पहिलीच घटना
येथील जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात प्रवेश करून आरोपीने ॲटर्नीवर हल्ला केल्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र या घटनेमुळे थोडे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाय सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.