गोंदिया : जिल्हा परिषदेच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष होत आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळावे, यासाठी गरिबातला गरीब पालक खासगी शाळांकडे धाव घेत आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडू लागल्या आहेत. परिणामी २० विद्यार्थ्यांपेक्षा कमी पट असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णयशासनाने घेतला आहे. कमी पटसंख्येमुळे ३५ शाळा शासनाने यापूर्वीच बंद केल्या आहेत. सद्य स्थितीत गोंदिया जिल्ह्यातील २०६ शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी असल्यामुळे त्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यात आमगाव तालुक्यातील २६, अर्जुनी - मोरगाव १८, देवरी ४७, गोंदिया २३, गोरेगाव २५, सडक - अर्जुनी १९, सालेकसा ३० आणि तिरोडा तालुक्यातील १८ अशा एकूण २०६ शाळांना कुलूप लागणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील ३५ शाळा पटसंख्येअभावी याआधीच बंद करण्यात आल्या आहेत.
बॉक्स
यापूर्वी ३५ शाळा झाल्या बंद
२० पटसंख्येअभावी गोंदिया जिल्ह्यातील ३५ शाळा यापूर्वी बंद पडल्या आहेत. त्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ६, आमगाव तालुक्यातील ६, देवरी तालुक्यातील ३, गोंदिया व गोरेगाव तालुक्यातील प्रत्येकी १, सालेकसा तालुक्यातील ८ आणि तिरोडा तालुक्यातील दोन शाळांचा समावेश आहे.
बॉक्स
विद्यार्थ्यांचे होणार समायोजन
२० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांतील विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्यात येणार आहे. प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी एक किलोमीटरच्या आतील शाळा, तर उच्च प्राथमिकच्या विद्यार्थ्यांसाठी तीन किलोमीटरच्या आतील शाळा देण्यात येणार आहे.
बॉक्स
शिक्षकांना मिळणार नजीकची शाळा
ज्या शाळेतील पटसंख्या २०पेक्षा कमी आहे, ती शाळा बंद झाल्यास त्या शाळेतील शिक्षकांचे समायोजन नजीकच्या शाळेत करण्यात येणार आहे. नजीकच्या शाळेत शिक्षकांची जागा रिक्त नसल्यास त्याच तालुक्यात शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे.
कोट
शासनाच्या निर्देशानुसार २०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद केल्यानंतर त्या शाळेतील इतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि येण्या-जाण्याचा त्रासही होऊ नये म्हणून त्या विद्यार्थ्यांचे समायोजन नजीकच्या शाळेत केले जाणार आहे. शिक्षकांसंदर्भातही तिच भूमिका आहे.
- राजकुमार हिवारे, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, गोंदिया.
..........
अशी आहे आकडेवारी
जिल्हा परिषदेच्या एकूण शाळांची संख्या - १०३९
पटसंख्येअभावी यापूर्वी बंद पडलेल्या शाळा - ३५
२०पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सद्यस्थितीतील शाळा - २०६