प्रारूप यादीची प्रसिद्धी : २९ ला जाहीर होणार अंतिम गोंदिया : नगर परिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार गोंदिया नगर परिषदेची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. त्यावर येत्या २१ तारखेपर्यंत आक्षेप मागविण्यात आले आहेत. त्यानंतर २९ तारखेला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. राज्यातील नगर परिषद व नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार ८ जानेवारी रोजी गोंदिया नगर परिषदेची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणेची तयारी पूर्वीपासूनच सुरू झाली आहे. यात १० आॅक्टोबर रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यावर पाच आक्षेप सध्या आले असून आणखीही आक्षेप येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नगर परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने आता निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. यामध्ये नगरसेवक ते नगराध्यक्षपदासाठी इच्छूकांकडून फिल्डींग लावण्याचे काम सुरू झाले असून त्याला आता अधिकच जोर येणार आहे. आॅक्टोबर महिना आता दिवाळीतच निघून जाणार असून नोव्हेंबर व डिसेंबर हे दोनच महिने उमेदवारांना जनसंपर्क निर्माण करण्यासाठी मिळणार आहेत. त्यामुळे त्यांची लगबग वाढली असून इच्छूकांची तिकीटसाठी जोड-तोड सुरू झाली आहे. शहरात यंदा २१ प्रभाग तयार करण्यात आले असून प्रत्येक प्रभागात दोन सदस्य राहणार आहेत. असे एकूण ४२ सदस्य निवडले जाणार असून सोबतच अध्यक्ष आता जनतेतून निवडला जाणार असल्याने मतदारांना तीन जागांसाठी मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.
मतदार यादीवर २१ पर्यंत आक्षेप
By admin | Published: October 19, 2016 2:50 AM