गोंदिया : पोलिस अधीक्षकांनी गठित केलेल्या विशेष पथकाने सुरू केलेल्या धडक कारवायांमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. अशातच आता विशेष पथकाने थेट महालगाव येथील वैनगंगा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचे खनन करणाऱ्यांना दणका दिला आहे. पथकाने रेतीचे खनन करणाऱ्या २१ आरोपींना अटक केली असून त्यांच्या जवळून २१ ट्रॅक्टर ट्रॉलीसह ५ ब्रास वाळू असा एक कोटी २७ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. १२) करण्यात आली आहे.
पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विशेष पथकाची स्थापना करून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बेकायदेशीर व अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनात देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या विशेष पथकाने गुरुवारी (दि. १२) दुपारी ३ वाजता दवनीवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महालगाव घाट वैनगंगा नदीच्या पात्रातून रेतीचे खनन करून वाळूची चोरी करताना २१ ट्रॅक्टर पकडले. यात एक कोटी २७ लाख २० हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. महालगाव घाट वैनगंगा नदी पात्रातून अवैधरीत्या वाळूचे उत्खनन करून स्वतः चे आर्थिक फायद्याकरिता शासनाचा महसूल बुडवून रेतीची चोरी करणाऱ्या आरोपींवर दवनीवाडा पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ३७९,३४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींवर गुन्हा दाखल
या प्रकरणात धापेवाडा येथील प्रमोद कबीरलाल येरणे (२५), मुकेश सुरेश येरणे (२४), राहुल मानिकचंद ठकरेले (२३), बलदेव अनंतराम मस्करे (३९), अनिल बळीराम कवरे (३७), महालगाव येथील धर्मेंद्र सुरेश नैखाणे (२८), देवानंद अर्जुन आगाशे (२२), लक्ष्मीनारायण मुलचंद भोयर (२५), किशोर तेजराम आगाशे (२५), शुभम लक्ष्मी प्रसाद लिल्हारे (२९), भूषण कपूरचंद नागपुरे (५१), सुरेंद्र पुरणलाल आगाशे (२१), नितेश नंदलाल भुरे (२४), प्रवीण चेतनदास नागपुरे (२२), शिवनी येथील फिरोज अनंतराम मानकर (४०), निलज येथील तिलक इंद्रपाल पालेवार (२७), पांढराबोडी येथील विशाल देवलाल भुरे (२१), रतनारा येथील आशिष भाऊलाल गायकवाड (३१), लोधीटोला येथील क्रिष्णा कुवरलाल मेश्राम (२७), मुरदाडा येथील रिंकू हरिशंकर गुडय्या (२५), गुलाब ग्यानिराम नागपुरे (२८) रा. सावरी ता. जि. बालाघाट (मध्यप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.