गोंदिया : मध्यंतरी नियंत्रणात आलेल्या कोरोनाने आता पुन्हा एकदा आपला कहर सुरू केला आहे. मात्र त्याचे आताचे रूप आणखीच भयावह असून आताचा कोरोना जीवघेणा ठरत असल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यातीलच चित्र बघावयाचे झाल्यास या महिन्यातील १० दिवसांत तब्बल २१ बाधितांचा जीव कोरोनाने घेतला आहे. मागील सलग ४ दिवसांपासून मृतांची आकडेवारी ४-५ च्या घरात असून यातून कोरोनाचे खरे रूप दिसून येत आहे.
राज्यात कहर करणारा कोरोना आपल्या जिल्ह्यात नियंत्रणात असल्याचे म्हणवून बेफिकीर असलेल्यांना आता मात्र कोरोनाचा धसका घेण्याची वेळ आली आहे. बघता-बघता कोरोना बाधितांची संख्या ७०० च्या घरात जात असून यातून कोरोना आता आपल्या खऱ्या रंगात आल्याचे बघावयास मिळत आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षा पेक्षा जास्त बाधित व मृतांची आकडेवारी यंदा बघावयास मिळत आहे. यातून कोरोनाचे नवे रूप किती भयावह आहे याची प्रचिती काहीच दिवसांत जिल्ह्यात बघावयास मिळत आहे.
विशेष म्हणजे, कोरोनामुळे जिल्ह्यात एप्रिल महिन्यात १० दिवसांत २१ बाधितांचा जीव गेला असून यामुळे जिल्हावासी आता दहशतीत आले आहेत. मागील ४ दिवसांपासून सलग ४-५ बाधितांचा मृत्यू होत असल्याची नोंद घेतली जात आहे. हेच कारण आहे की, जिल्ह्यातील मृतांचा ग्राफही दररोज वर-वर चढत चालला आहे. अशात आता नागरिकांनी गाफील न राहता खबरदारी घेण्याची गरज आहे.
-----------------------------------
आतापर्यंत २१५ नागरिकांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची संख्या २१५ पर्यंत पोहचली आहे. त्यात आता कधी नव्हे ते मागील ४ दिवसांपासून दररोज मृत्यू संख्या वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात शनिवारपर्यंत गोंदिया तालुक्यात सर्वाधिक १२२ बाधितांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तिरोडा तालुका असून येथे २९ बाधितांचा कोरोनामुळे जीव गेला आहे.
---------------------------
आता तरी गांभीर्याने घ्या
कोरोनाचे भयंकर रूप बघता आता भल्याभल्यांनी धसका घेतला आहे. हाताबाहेर जात असलेली स्थिती बघता शासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे. जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र नागरिकांकडून त्यांचे उल्लंघन करून मनमर्जीपणा सुरू आहे. हा प्रकार आता अंगलट येत असल्याने आता तरी गांभीर्याने घेण्याची वेळ आली असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
----------------------------------------------
जिल्ह्यातील मृतांचा तालुकानिहाय तक्ता
तालुका मृत्यू संख्या
गोंदिया १२२
तिरोडा २९
गोरेगाव ०९
आमगाव १३
सालेकसा ०५
देवरी १०
सडक-अर्जुनी ०६
अर्जुनी-मोरगाव ११
इतर राज्य-जिल्हा १०
एकूण २१५