कपिल केकत, गोंदिया: जिवापेक्षा मोठी अन्य कोणतीही संपत्ती नाही, असे म्हटले जाते. नक्कीच यात तथ्य आहे. मात्र, यानंतरही कित्येक जण जिवाची पर्वा न करता वाहन दटावताना दिसतात. याचा शेवटही त्यांच्या जिवावर बेतूनच होतो. जिल्ह्यात मागील ११ महिन्यांत घडलेल्या २३० अपघातांत १३५ जणांनी जीव गमावल्याची आकडेवारी असल्याने याची प्रचिती येते. यामुळेच वाहन चालविताना घाई कशाला, घरचे तुमची वाट बघत आहेत ! एवढा भान ठेवणे गरजेचे आहे.
आपल्या अपत्यांना अधिकाधिक सुविधा मिळाव्या, यासाठी पालक अल्पवयातच त्यांच्या हाती वाहन देत आहेत. हाती वाहन आल्यानंतर मात्र ही मुले आपल्या जिवाची पर्वा न करता भरधाव वेगात वाहन चालवून ‘रेस’ लावताना दिसत आहे. तरुण-तरुणीही वाहनाला विमान समजून चालवित असल्याने जिल्ह्यात अपघातांचे प्रमाण वाढले आहे. मागील ११ महिन्यांतील आकडेवारी तपासली असता, त्यात २३० अपघात घडले असून ११६ अपघातांत तब्बल १३५ जणांनी आपला जीव गमावल्याचे दिसून येते. तर, ७१ अपघात गंभीर स्वरूपाचे असून त्यात १६४ जण गंभीर जखमी झाले असतानाच ३५ अपघातांत ५९ जण किरकोळ जखमी झाले असून फक्त ८ अपघातांत कुणीही जखमी झाले नसल्याचे दिसून येत आहे.
अपघातांच्या या वर्गवारीत १३५ जणांचा जीव गेला असून, यामध्ये कुणाचा मुलगा व मुलगी हिरावली आहे. मात्र, त्यातह खेदाची बाब घरचा कमावता व लहान-लहान मुलांना सोडून गेलेल्या व्यक्तीची कमतरता कशी भरून निघणार ही गंभीर बाब आहे. यामुळे कोठेही जाताना ‘लवकर निघा, हळू चालवा व सुखरूप पोहोचा’ या मंत्राचा अंमल प्रत्येकानेच करण्याची गरज आहे. कारण, प्रत्येकाच्याच घरी कुणीतरी वाट बघत आहे.
सर्वाधिक प्राणांतिक अपघात एप्रिल व ऑक्टोबर महिन्यात
जिल्ह्यात ११ महिन्यांमध्ये २३० अपघातांची नोंद घेण्यात आली असून, यातील ११६ अपघातांत १३५ जणांचा जीव गेला आहे. हे प्राणांतिक अपघात एप्रिल व ऑक्टोबर महिन्यातच सर्वाधिक घडले आहेत. एप्रिल महिन्यात घडलेल्या २६ अपघातांत १९ जणांचा जीव गेला असून ऑक्टोबर महिन्यात घडलेल्या २४ अपघातांत सुद्धा १९ जणांचा जीव गेला आहे. तर जून महिन्यातील २७ अपघातांत तब्बल ४५ जण गंभीर जखमी झाल्याची नोंद आहे.
मायबाप हो, आपल्या पाल्यांकडे लक्ष द्या!
आजघडीला शाळेत शिकणारी मुले-मुली वाहन चालविताना दिसत आहेत. मात्र, ते भरधाव वेगात वाहन चालवून एकमेकांशी रेस लावत असून, येथेच अपघात घडतात. ही बाब त्यांच्यासह अन्य नागरिकांसाठीही धोक्याची आहे. अशात पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन देऊ नये. तसेच, आपली मुले अल्पवयीन असो वा नसो मात्र त्यांच्याकडेही पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे.
नियमांचे पालन करा
वाहतुकीचे नियम सर्वांच्या सुरक्षेसाठी आहेत. नियम मोडल्यास अपघात घडतात व यामध्ये कित्येकांना जीव गमवावा लागतो. यामुळे वाहन चालविताना नियमांचे पालन करा. कारण, प्रत्येकाच्याच घरी त्यांची वाट बघणारे आहेत.- किशोर पर्वते, निरीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, गोंदिया
महिनानिहाय मृतांची संख्या
महिना- मृत
- जानेवारी- ८
- फेब्रुवारी- १२
- मार्च- ९
- एप्रिल- १९
- मे- १६
- जून- १४
- जुलै- ११
- ऑगस्ट- ५
- सप्टेंबर -११
- ऑक्टोबर- १९
- नोव्हेंबर- ११
----------------------------------
अपघातातील मृत, गंभीर व किरकोळ जखमी
महिना- मृत- गंभीर - किरकोळ जखमी
- जानेवारी- ८-१३-२
- फेब्रुवारी-१२-१०-६
- मार्च- ९-१०-१५
- एप्रिल- १९-२३-२
- मे- १६-१६-५
- जून-१४-४५-५
- जुलै- ११-१२-२
- ऑगस्ट- ५-११-१२
- सप्टेंबर- ११-५-१
- ऑक्टोबर-१९-९-४
- नोव्हेंबर- ११-१०-५