नरेश रहिले
गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. अनेक निरपराध बालकांच्या डोक्यावरील माता-पित्यांचे छत्र हरपले. आताही कोरोनाचे संकट कमी झाले नाही. या संकटात अनेकांनी प्रिय व्यक्ती गमावल्या. पालन-पोषण करणारा आधारच गेला. आई-वडील, आजाेबा, मामा, काकांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. मातृ-पितृ छत्र हरवलेल्या बालकांच्या भविष्याचा गंभीर प्रश्न लक्षात घेत शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाने या मुलांच्या पुनर्वसनाचा निर्णय घेतला आहे. गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाने २३२ बालके अशी आढळलीत त्यांच्या आई-बाबा यांच्यापैकी एकाचा काेरोनाने मृत्यू झाला. तर ११ बालकांचे आई-वडील दोन्ही मृत्यू पावले. १८ वर्षांखालील २४३ बालके अशी आढळलीत की त्यांचे पालक कोरोनामुळे हे जग सोडून गेलेत.
शासनाच्या ७ मे रोजी निर्देशानुसार जिल्हास्तरीय कृती दल गठण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा विधि व सेवा प्राधिकरणचे सचिव, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, नगर परिषदेचे मुख्याधिकारी, बालकल्याण समितीचे अध्यक्ष, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी (जि.प.), तसेच चार निमंत्रित सदस्यांचा या कृती दलात समावेश करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण, शिक्षणाधिकारी,जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या यंत्रणेमार्फत गावस्तरापासून ही माहिती संकलित केली जात आहे.
...........................
महिला बालकल्याण विभागाच्या अनाथांच्या घरी भेटी
कोविडने मृत्यू पावलेल्या पालकांची मुले अनाथ झाली अशा गोंदिया जिल्ह्यातील २४३ अनाथ बालकांच्या घरी स्वत: महिला व बालकल्याण विभागाने भेटी दिल्या आहेत. त्यांचा सामाजिक तपासणी अहवाल तयार करून बालकल्याण समितीसमोर सादर करण्यात आले आहेत.
...............................................
कोरोनाने आई किंवा बाबा हिरावलेल्यांची संख्या २४३
एक पालक गमावलेली बालके -२३२
दोन पालक गमावलेली बालके -११
..................