गोंदिया : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ अन्वये वंचित व दुर्बल घटकातील बालकांकरिता इंग्रजी माध्यम विनाअनुदानित शाळांमध्ये २५ टक्के मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया ११ जूनपासून सुरू होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील ८७९ जागांसाठी ८५४ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यासाठी गोंदिया जिल्ह्यातील ९ हजार ८९३ लोकांनी अर्ज केले होते. ११ जूनपासून शाळास्तरावर प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. पालकांनी शाळेत जाऊन आवश्यक कागदपत्रे मूळ प्रतीत व छायांकित प्रतसुद्धा घेऊन जावे. शाळेत रहिवासी पत्त्याचा पुरावा, फॉर्म भरताना दर्शविलेले अंतर, दस्तऐवज याची तपासणी शाळा स्तरावर करण्यात येणार आहे. चुकीची माहिती आढळल्यास तालुका तपासणी समितीकडून शहानिशा केली जाणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील १४७ शाळांमध्ये ८७९ जागा रिक्त आहेत. पहिल्या लॉटरीत ८५४ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांनी दिली.
आरटीईचा २५ टक्के प्रवेश ११ पासून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:20 AM