जिल्ह्यातील एकूण महाविद्यालये : ४५, पहिल्या दिवशी सुरू झालेली २५ : पहिल्या दिवशी उपस्थित १५२४३
गोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत असल्याने शालेय शिक्षण विभागाने शाळा, महाविद्यालये टप्प्याटप्य्याने सुरू करण्यास सुरुवात केली आहे. १५ जानेवारीपासून महाविद्यालये सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील एकूण ४५ महाविद्यालयांपैकी पहिल्या दिवशी २५ महाविद्यालये सुरू झाली. उर्वरित २५ महाविद्यालये येत्या दोन दिवसांत सुरू होणार आहेत. कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेता आवश्यक ती काळजी घेतली जात आहे. काही महाविद्यालयांचे सॅनिटायझेशन आणि साफसफाईची कामे शिल्लक असल्याने ही महाविद्यालये बुधवारपासून नियमित सुरू होणार आहेत. तब्बल ११ महिन्यांनंतर महाविद्यालये सुरू झाल्याने विद्यार्थी उत्साहात होते, पण पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांची फारशी उपस्थिती दिसून आली नाही. कदाचित पहिलाच दिवस असल्याने महाविद्यालयात उपस्थिती कमी दिसून आली. दरम्यान, महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाकडून वर्ग खोल्यांचे सॅनिटायझेशन, प्रवेशद्वारावरच थर्मल स्क्रिनिंग आणि सॅनिटाइझ करूनच विद्यार्थ्यांना आत प्रवेश दिला जात होता.
........
प्रवेशद्वारावर घेतली जातेय दक्षता
कोरोना संसर्गाच्या सावटाखाली महाविद्यालये सुरू करण्यात आली. मात्र, ती सुरू करण्यापूर्वी शिक्षण विभागाने आवश्यक ती काळजी घेण्याच्या सूचना महाविद्यालयांना केल्या होत्या. त्याचे पालनसुद्धा महाविद्यालयांकडून होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांची थर्मल स्क्रिनिंग केली जात होती. तसेच मास्क असलेल्या विद्यार्थ्यांना आत प्रवेश दिला जात होता.
......
प्राचार्यांचा कोट
महाविद्यालये सुरू करताना जिल्हाधिकारी आणि शिक्षण विभागाने तीन गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्व प्राध्यापक व कर्मचारी यांची कोरोना चाचणी, विद्यार्थ्यांच्या पालकांचे सहमतीपत्र आवश्यक आहे. त्यामुळे या सर्व बाबींची पूर्तता करून आणि कोरोना नियमांचे पालन करूनच महाविद्यालय सुरू करण्यात येत आहे.
- डॉ. अंजन नायडू, प्राचार्य डी. बी. सायन्स महाविद्यालय
.......
पहिला दिवस कसा गेला ....
तब्बल ११ महिन्यांनंतर महाविद्यालय सुरू होत असल्याचा आनंद होता. महाविद्यालय सुरू झाल्याने मित्रांना भेटता, तसेच आता ऑनलाइन अभ्यासापासून थोडी सुटका मिळेल. सोमवारी महाविद्यालयात गेल्यानंतर सर्वांना भेटून फारच प्रसन्न वाटले.
-
.....
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षीपासून महाविद्यालय बंद होते. सर्व ऑनलाइन सुरू असल्याने घरी राहूनसुद्धा कंटाळा आला होता. मात्र, शुक्रवारपासून महाविद्यालय सुरू झाल्याने थोडे बरे वाटले. महाविद्यालयात गेल्यानंतर सर्वजण आपला गेल्या अकरा महिन्यांतील अनुभव सांगत होते. त्यामुळे पहिला दिवस आनंदात गेला.
-
.....
महाविद्यालयाचा शुक्रवारी पहिलाच दिवस असल्याने सर्व मित्रांना भेटण्याची उत्सुकता होती. मागील वर्षीपासून घरीच राहून ऑनलाइन अभ्यास करावा लागत होता. त्यामुळे बाहेर पडता येत नव्हते. मात्र, आता महाविद्यालय सुरू झाल्याने प्रसन्न वाटत आहे.
-
......