लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६२ पोहचला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली असली तरी आत्तापर्यंत एकूण २८ जण कोरोनामुक्त झाले असून ही दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी (दि.२९) एकाच दिवशी जिल्ह्यातील २५ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.तब्बल ३९ दिवस कोरोनामुक्त असलेल्या गोंदिया जिल्ह्यात मुंबई आणि पुण्याहून आलेल्या मजूर आणि नागरिकांमुळे १९ मे रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. १९ मे रोजी दोन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर २१ मे रोजी तब्बल २७ रुग्णाची नोंद झाली. त्यानंतर २२ मे रोजी १० कोरोनाबाधित रुग्ण वाढले. यानंतर सातत्याने कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे २९ मे पर्यंत हा आकडा तब्बल ६२ वर पोहचला. केवळ आठ ते दहा दिवसांच्या कालावधी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याने जिल्हावासीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दररोज एक दोन रुग्ण वाढत असल्याने आणि सर्व रुग्ण हे ग्रामीण भागातील असल्याने ग्रामीण भागात कोरोनाचे हॉटस्पॉट तयार होत असल्याचे चित्र आहे. सर्वाधिक ३२ कोरोनाबाधित रुग्ण हे अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून परतलेले आहे. मात्र यात समाधानाची बाब म्हणजे कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. गुरूवारपर्यंत ३ कोरोनाबाधित रुग्ण कोरोना मुक्त झाले होते. तर शुक्रवारी पुन्हा २५ कोरोनाबाधित रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे ६२ पैकी एकूण २८ कोरोनाबाधित रुग्ण आत्तापर्यंत कोरोनामुक्त झाल्याने ही जिल्हावासीयांसाठी खरोखरच दिलासादायक बाब आहे. शुक्रवारी (दि.२९) कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांमध्ये ५ सडक अर्जुनी तालुक्यातील आणि २० अर्जुनी मोरगाव तालुक्यातील आहे. या सर्व रुग्णांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नवीन निदेर्शानुसार आणि या रुग्णांमध्ये कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने कुठलीच लक्षणे नसल्याने सुटी देण्यात आली. तसेच त्यांना ७ दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. त्यांचे समुपदेशन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी केल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्याम निमगडे यांनी सांगितले.पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्या वाजवून दिला निरोपगोंदिया जिल्हा क्रीडा संकुलातील आयसोलेशन कक्षात मागील आठ दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी २५ कोरोना बाधीत रुग्ण शुक्रवारी (दि.२९) कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. या रुग्णांना रुग्णालयातून सुटी झाल्यावर निरोप देताना कोविड केअर सेंटरमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आणि टाळ्या वाजवून त्यांचे मनोबल वाढवित निरोप दिला.विदर्भातील पहिलीच घटनाकोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या ६२ कोरोनाबाधित रुग्णांपैकी एकाच दिवशी तब्बल २५ कोरोनाबाधित रुग्णांना कोरानामुक्त घोषीत करुन रुग्णालयातून सुटी देण्याची ही विदभार्तील पहिलीच घटना आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे लवकर बरे होण्याचे प्रमाण देखील चांगले असल्याने जिल्हावासीयांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
गोंदिया जिल्ह्यात २५ कोरोनामुक्त; तीन नवीन रूग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 8:05 PM
मागील आठवडाभरापासून गोंदिया जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ६२ पोहचला आहे. त्यामुळे जिल्हावासीयांच्या चिंतेत वाढ झाली असली तरी आत्तापर्यंत एकूण २८ जण कोरोनामुक्त झाले असून ही दिलासादायक बाब आहे.
ठळक मुद्देरुग्ण वाढीचा वेग कायम