सालेकसा : गोंदियाचे जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखेडे यांच्यावतीने मुंडीपार येथील मोहारे कुटुंबाला २५ हजारचे किसान विकास पत्र देऊन विभागातर्फे मदतीचा हात देण्यात आला.
दिव्यांग दिलीप मोहारे यांची छोटी मुलगी दिव्या मोहारेच्या शिक्षणासाठी व पुढील भविष्यासाठी मदत म्हणून तिच्या नावाने किसान विकास पत्र देण्यात आले. ही मदत मोहारे कुटुंबासाठी परिपूर्ण नसली तरी, यामुळे दिव्याला तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत होईल. सर्पदंशाने आई आणि भावाचा मृत्यू झाल्याने आणि वडील पूर्ण शरीराने दिव्यांग असल्याने मोहारे कुटुंबातील दोन बहिणी गायत्री आणि दिव्या यांचे भविष्य अंध:कारमय बनले आहे. याची दखल घेत ‘लोकमत’ने त्यांची व्यथा मांडली आणि या बातमीची दखल घेऊन थेट जिल्हाधिकारी मदतीला धावून आले. त्यानंतर मोहारे कुटुंबाला मदतीचा ओघ सुरू झाला. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सुद्धा आपला मदतीचा हात पुढे केला. लहान बहीण दिव्याच्या नावे २५ हजाराचे किसान विकास पत्र दिले. यावेळी डी. के. वानखेडे यांच्यासोबत धान्य खरेदी अधिकारी लीना फळके, निरीक्षण अधिकारी नीलेश देठे उपस्थित होते.