नरेश रहिले / लोकमत विशेष
गोंदिया : मध्यंतरी आलेल्या ‘'सैराट’ या प्रेमकथेवर आधारित चित्रपटाने आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. या सिनेमाच्या धर्तीवर अल्पवयीन मुलींनी प्रियकरासोबत पलायन केले. परंतु प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुलींना प्रियकराकडून मिळालेली अमानुष वागणूक व दाखविलेले स्वप्न भंग झाल्याने प्रियकरासोबत पळून गेलेल्या मुली घरी परतल्या. मागील चार वर्षात २५४ मुली, तर ३९ मुले असे २९३ मुले-मुली घरी परतले आहेत.
आपले मुले-मुली आदर्श नागरिक घडतील असे स्वप्न आई-वडील बघत असताना तीच मुले आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरत असतील तर यात आजघडीला काही नवल नाही. गोंदियासारख्या छोट्या जिल्ह्यातूनही वर्षाकाठी शेकडो मुली आपल्या आई-वडिलांच्या अपेक्षांवर पाणी फेरून प्रियकरासोबत पलायन करीत आहे. परंतु प्रियकरासोबत पलायन झालेल्या मुलींना त्यांचे स्वप्नभंग होत असल्याचे लक्षात येत असल्याने डोळ्यात अश्रू घेऊन घरी परत येत आहेत. त्यातच त्या मुली आपल्या आई-वडिलांचा मानसन्मान समाजातून कमी करण्याचा प्रयत्न करतात. अपहरण व बेपत्ता झालेल्या बालकांच्या शोधासाठी शासनाने ऑपरेशन ‘मुस्कान’ हा उपक्रम राबविला. या उपक्रमाची फलश्रुती म्हणजेच जिल्ह्यात मागील चार वर्षात म्हणजे सन २०१७ ते २०२० याकाळात सैराट झालेल्या ३२२ पैकी २५४ मुले-मुली आपल्या घरी सुखरूप परतल्या आहेत. यामध्ये २५४ मुली व ३९ मुले आहेत. मात्र २९ मुली अजूनही बेपत्ता आहेत. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालानुसार १८ वर्षांखालील हरविलेल्या मुलांना शोधण्याचे प्रमाण महाराष्ट्रात राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे.
बॉक्स
यंदा ५६ टक्केच बालकांचा शोध
गोंदिया जिल्ह्यातील १८ वर्षांखालील हरविलेली मुले मिळून येण्याचे प्रमाण सन २०१७मध्ये ९८ टक्के, सन २०१८मध्ये ९८.८८ टक्के, सन २०१९ मध्ये ९२.०७ टक्के, तर सन २०२०मध्ये ५६.०९ टक्के आहे. सन २०१७ मध्ये १४ मुले व ६३ मुली असे ७७ बालके हरविलेली होती. त्यापैकी १४ मुले व ६२ मुली अशा ७६ मुला-मुलींना शोधण्यात आले आहे. सन २०१८मध्ये आठ मुले व ८२ मुली असे ९० मुलेमुली हरविली होती व त्यापैकी आठ मुले आणि ८१ मुली अशा ८९ मुला-मुलींना शोधण्यात आले आहे. सन २०१९ मध्ये १५ मुले, ९९ मुली असे ११४ हरविली होती. त्यापैकी १५ मुले आणि ९० मुली अशा १०५ मुला-मुलींना शोधण्यात आले आहे. दरवर्षीची परिस्थिती पाहता सन २०२० मध्ये लाॅकडाऊन असल्याने हरविलेल्या मुलींची संख्या ५० टक्के असून, त्यात दोन मुले व ३९ मुली असे ४१ मुले-मुली हरविले. त्यापैकी दाेन मुले, तर २१ मुली अशा २३ बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले.
बॉक्स
२९ मुलींचा घेणार शोध
मागील चार वर्षाची परिस्थिती पाहता गोंदिया जिल्ह्यातील २९ मुली अजूनही बेपत्ता आहेत. त्यात सन २०१७ व सन २०१८ मधील प्रत्येकी १ अशा २ मुली, सन २०१९ मध्ये नऊ मुली, तर सन २०२० मधील १८ मुली अशा एकूण २९ मुली अजूनही बेपत्ता आहेत.