६ तारखेला रक्कम दिली : सुटकेचा नि:श्वास लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नोटबंदीमुळे जिल्हा बँकेकडे पडून असलेले २६ कोटी रूपये अखेर रिझर्व बँकेकडे जमा करण्यात आले. ६ जुलै रोजी जिल्हा बँकेने त्यांच्याकडील २६ कोटी रूपयांची जुन्या नोटांतील रक्कम नागपूरला जमा केली. त्यामुळे मागील सुमारे आठ महिन्यांपासून टेंशनमध्ये असलेल्या जिल्हा बॅकेने आता सुटकेचा नि:श्वास घेतला आहे. केंद्र शासनाने नोटबंदीचे पाऊल उचलल्यानंतर जिल्हा बँकेकडे यादरम्यान ही २६ कोटी रूपयांची जुन्या नोटांतील रक्कम जमा झाली होती. अवघ्या राज्यातच ही स्थिती होती व शासनाने जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई केल्याने जिल्हा बँकेकडे ही रक्कम पडून होती. एवढी मोठी रक्कम बँकेत पडून असल्याने सहजीकच बँकेच्या कामकाजावर परिणाम पडत होता. आता खरिपाचा हंगाम सुरू असून कर्ज वाटपाचा विषय महत्वाचा आहे. शिवाय अन्य दैनंदिन कामकाजासाठी ही रक्कम कामी पडू शकत होती. मात्र चलनबाद झालेल्या नोटांची ही रक्कम असल्याने तिचा काहीच उपयोग नव्हता. अवघ्या राज्यातील जिल्हा बँकांकडे अशा प्रकारे कोट्यवधींची रक्कम पडून होती. त्यामुळेही रक्कम रिझर्व बँकेने रक्कम परत घ्यावी यासाठी वरिष्ठ स्तरावर बोलणी सुरू होती. नोटाबंदी होऊन आता आठ महिन्यांचा काळ लोटला व अखेर शासनाने जिल्हा बँकांकडे असलेली रक्कम स्वीकारण्यास होकार दिला. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हा बँकांच्या जीवात जीव आला व रक्कम स्वीकारण्यात येणार असल्याबाबतचे पत्रही रिजर्व्ह बँकेकडून जिल्हा बँकांना प्राप्त झाले होते. शासनाने जुन्या नोटा स्वीकारण्यासाठी १९ जुलै ही तारीख ठरवून दिली होती व त्यानुसार सर्व बँकांना ठरावीक दिवशी बोलावून त्यांची रक्कम स्वीकारली जाणार होती. त्यानुसार, जिल्हा बँकेला ६ तारीख ठरवून देण्यात आली होती. रिजर्व बँकेकडून याबाबत पत्र मिळताच येथील जिल्हा बँकेने त्यांच्याकडे असलेली २६ कोटी रूपयांची रक्कम नागपूरच्या रिझर्व बँकेत जमा केली. एवढी मोठी रक्कम बँकेत पडून असल्याने व तिचे काय होणार या टेंशनमध्ये राज्यातील समस्त जिल्हा बँक होत्या. मात्र आता ही रक्कम रिझर्व बँकेने स्वीकारल्याने जिल्हा बँक आता ‘टेंशन फ्री’ झाली आहे.
जिल्हा बँकेचे २६ कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:04 AM