गोंदिया : अवैध दारू विक्रेत्यांविरोधात तिरोडा पोलिसांचे धाडसत्र सुरू असतानाच पोलिसांनी ग्राम सिल्ली व केसलवाडा येथे आणखी ३ ठिकाणी धाड घालून दोन लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. शनिवारी (दि.२०) सायंकाळी ७ वाजतापासून या कारवाया करण्यात आल्या आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ३ पथक तयार करून ग्राम सिल्ली व केसलवाडा येथे धाडसत्र राबविले. यामध्ये छाया सोविंदा बरेकर (रा. सिल्ली) हिच्या घरात धाड घालून पोलिसांनी ६० लिटर हातभट्टी दारू, किंमत आठ हजार रुपये, १४५ प्लास्टिक पोत्यात १४५० किलो सडवा मोहफूल, किंमत एक लाख १६ हजार रुपये, ४ लोखंडी ड्रम, किंमत चार हजार रुपये, ४ जर्मनी टवरे, किंमत चार हजार रुपये, २ क्विंटल सरपण, किंमत एक हजार ५०० रुपये असा एकूण एक लाख ३१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला, तर संजय सोविंदा बरेकर (रा. सिल्ली) याच्या घरातून ८० लिटर मोहाची दारू, किंमत आठ हजार रुपये, १३५ प्लास्टिक पोत्यात १३५० किलो सडवा मोहफूल, किंमत एक लाख आठ हजार रुपये, ३ लोखंडी ड्रम, किंमत तीन हजार रुपये, २ क्विंटल सरपण, किंमत एक हजार ५०० रुपये, ३ जर्मनी टवरे, किंमत तीन हजार रुपये असा एकूण एक लाख २३ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला.
तसेच, राजकुमार बालचंद कनोजे (रा. केसलवाडा) याच्या घरातून एक हजार रुपयांची १० लिटर मोहाची दारू जप्त केली आहे. अशाप्रकारे पोलिसांनी एकूण दोन लाख ६५ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. आरोपी राजकुमार बालचंद कनोजे याला अटक करण्यात आली आहे.