गोंदिया : एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा यासह अन्य मागण्यांना घेऊन गेल्या महिनाभरापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. या संपावर अद्यापही तोडगा न निघाल्याने एसटीची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संपामुळे मागील २९ दिवसात तिरोडा आणि गोंदिया आगाराचे २० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. यामुळे सेवा सुरळीत झाल्यानंतरही याची झळ आगारांना सहन करावी लागणार आहे.
राज्य शासनाने एसटी कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहे. मात्र, संपकरी कामगार आपल्या मागण्यावर ठाम असून गोंदिया आगारातील एकही चालक, वाहक कामावर परतलेला नाही. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी रविवारपर्यंत कामावर रुजू न होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला होता. याच अंतर्गत सोमवारी भंडारा विभागांतर्गत येणाऱ्या सहा आगारातील २७ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले.
आतापर्यंत १७९ जणांचे निलंबन झाले आहे. तर, ८६ अस्थायी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तसेच आतापर्यंत, तिरोडा आगारातील १, गोंदिया आगारातील ११ कामगारांचे निलंबन तर, १९ कामगारांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. गोंदिया आगारातील सर्व वाहक व चालक संपावर असल्याने आगारातून सुटणाऱ्या एसटीच्या दररोजच्या २२३ बस फेऱ्या रद्द आहेत. परिणामी २९ दिवसात आगाराचे २० कोटीपेक्षा जास्त नुकसान झाल्याची माहिती आगार व्यवस्थापक संजना पटले यांनी दिली.
३१ ऑक्टोबरपासून सुरू आहे संप
राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्याच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी ३१ ऑक्टोबरपासून संप पुकारला आहे. निलंबन व सेवा समाप्तीची कारवाई झाल्यानंतर तसेच वारंवार चर्चा करुनही तोडगा निघत नसल्याने शासनाने संपकरी कामगारांना पगार वाढ देऊनही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. एसटी कामगारांच्या संपामुळे प्रवाशांचा खोळंबा झालाय. प्रवासाची कोंडी वाढली आहे. राज्यातील काही आगारातील कर्मचारी कामावर परतले, काही भागात एसटीच्या फेऱ्या चालल्या. मात्र गोंदिया आगारातील कोणताच चालक-वाहक आजही कामावर परतलेला नाही. कार्यालयील अधिकारी, कर्मचारी वगळता सर्व २७० चालक-वाहक संपावर आहेत.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
दिवाळीच्या सुट्या संपल्यानंतर शाळा सुरु झाल्या आहे. मात्र एसटी सेवा बंद असल्याने ग्रामीण भागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना शाळेत येण्यापासून वंचित राहावे लागत आहे. खासगी वाहनाने दररोज प्रवास करणे शक्य नसल्याने या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आगारातील बसेसची संख्या
गोंदिया : ८०
तिरोडा : ४०