लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या १८ वर्षाखालील बालकांचे प्रमाण पाहून राज्य शासनाने पुन्हा पाचवे आॅपरेशन ‘मुस्कान’ १ ते ३१ जुलै दरम्यान राबविण्याचे ठरविले आहे. हरविलेल्या बालकांना शोधून त्यांच्या आईवडिलांच्या हवाली करण्यासाठी आॅपरेशन ‘मुस्कान’ ही मोहीम पुन्हा पाचव्यांदा चालविली जात आहे. गोंदिया जिल्हा पोलिसांच्या रेकॉर्डवर बेपत्ता असलेल्या ६ मुले व २३ मुली अशा २९ बालकांचा शोध या मोहिमेत घेतला जाणार आहे. मुलांच्या हातून भीक मागविण्यासाठी लहान बालकांचे अपहरण करून मोठ्या शहरात नेले जाते. त्यांना मारहाण करून त्यांच्या हातून भीक मागविणे, तर काहींना वाममार्गाकडे वळविले जाते. मुलींना देह व्यवसायाच्या कामात लावण्यासाठी त्यांचे अपहरण केले जाते. बेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने यापूर्वी चार वेळा आॅपरेशन ‘मुस्कान’ मोहीम २०१५ पासून चालविली आहे. या मोहीमेत अपहरण किंवा बेपत्ता असलेली बालके मोठ्या प्रमाणात मिळाली होती. सन २०१६ मध्ये जून महिन्यात आॅपरेशन ‘मुस्कान’ या अभियानाला जिल्ह्यात राबविले. गोंदिया जिल्ह्याच्या रेकॉर्डवर असलेल्या २ मुले व १७ मुली तर रेकॉर्ड बाहेरील १८ मुले ९ मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले होते.जिल्ह्यातील सद्यस्थतीत ६ मुले व २३ मुली अशी २९ बालके बेपत्ता असून त्यांचा शोध जिल्हा पोलिसांना घ्यावा लागणार आहे. यंदाच्या पाचव्या मोहिमेत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बसस्थानके, रूग्णालय, उद्याने, चौक, रेल्वेस्थानक,धार्मिक स्थळे, हॉटेल्स, धाबे, कारखाने यात काम करणारी बालके, सार्वजनिक ठिकाणी फिरस्ते किंवा भीक मागणाऱ्या मुलांचा शोध घेण्यात येणार आहे. सदर अभियान पोलीस अधिक्षक डॉ.दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पर्वते, रमेश गर्जे, महिला तक्रार निवारण केंद्राच्या जाधव, भागवत दसरीया व इतर कर्मचारी राबविणार आहेत.आतापर्यंत शोधली ४६ बालकेआॅपरेशन ‘मुस्कान’ प्रकल्पात पोलिसांनी सन २०१५ मध्ये जुलै महिन्यात ३१ बालकांचा शोध लावला होता. त्यानंतर दुसऱ्या मुस्कानमध्ये जानेवारी महिन्यात ६ व तिसऱ्या मुस्कानमध्ये मार्च महिन्यात २ बालकांना शोधला तर चवथ्या आॅपरेशन ‘मुस्कान’ मध्ये ७ बालकांना शोधून त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यात आले. अजूनही २९ बालकांचा शोध लागला नाही.सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावाया बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. परंतु या बालकांना त्यांच्या हक्काचे शिक्षण देणे या मूळ संकल्पनेला सर्वांनी तिलांजली देऊन फक्त त्यांना त्यांच्या आई-वडीलांच्या स्वाधीन करणे, आई-वडील नसल्यास बाल कल्याण समितीपुढे उभे करण्यापर्यंतचे काम पोलीस करतात. समितीने त्या बालकांना बाल सुधारगृहात पाठविण्यास सांगितल्यावर पोलीस त्या बालकांना नेऊन सोडून देतात. त्यानंतर त्या बालकांकडे दुर्लक्ष केले जाते. या बालकांचे शिक्षण व्हावे यासाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यायला हवा होता. परंतु गोंदियातील कोणत्याही सामाजिक संघटना आतापर्यंत पुढे आल्या नाहीत.मुख्य प्रवाहात कोण आणणार?ज्या बालकांना आॅपरेशन ‘मुस्कान’च्या माध्यामातून पकडण्यात येते त्या बालकांचे मातापिता नसल्यास त्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना शिक्षणाची, राहण्याची, खाण्याची व झोपण्याची सोय शासनाने करून देणे आवश्यक आहे. परंतु तसे झालेले नाही. पोलिसांनी बालकांना पकडल्यानंतर त्यांचे मातापिता मिळाले तर त्यांच्या स्वाधीन केले. ज्यांचे मातापिता नाहीत त्यांची रवानगी बाल सुधारगृहात केली. त्यामुळे त्या बालकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची सोय कोण करेल? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.त्यांचे जीवन फुलायला हवेबेपत्ता किंवा अपहरण झालेल्या बालकांना त्यांच्या मात्यापित्यांच्या स्वाधीन करण्यासाठी पोलीस विभागाने आॅपरेशन मुस्कान अभियानात पकडलेल्या अनेक बालकांचे जीवन आजही ‘जैसे थे’ आहे. पकडलेल्या बालकांची स्थिती या अभियानानंतरही जशीच्या तशीच आहे. या आॅपरेशन मुस्कान मोहिमदरम्यान पोलीस कुंटणखाण्यावर धाडी टाकून १८ वर्षाखालील मुलींची सुटका करणार आहे. तसेच कुंटणखाना चालविणाऱ्यावर योग्य ती कारवाई केली जाणार आहे. या मोहिमेसाठी मोबाईल, फेसबुक, व्हाटॅसअप व प्रसार माध्यम व सामाजिक संघटनांची मदत घेतली जाणार आहे. आॅपरेशन मुस्कानचे यशपहिले आॅपरेशन:-१ ते ३१ जानेवारी २०१५ मध्ये रेकॉर्डवरील २ मुले १२ मुली तर रेकॉर्ड व्यतिरिक्त १२ मुले ५ मुली मिळाल्या.दुसरे आॅपरेशन:- १ ते ३१ जानेवारी २०१६ मध्ये रेकॉर्ड व्यतिरिक्त ३ मुले ३ मुली मिळाल्या.तिसरे आॅपरेशन:-१ ते ३० एप्रिल २०१६ मध्ये रेकॉर्डवरील १ मुलगी तर रेकॉर्ड व्यतिरिक्त १ मुलगा.चवथे आॅपरेशन:-१ ते ३० जून २०१६ मध्ये रेकार्डवरील ४ मुली तर रेकॉर्ड व्यतिरिक्त २ मुले १ मुलगी मिळाली
२९ बालकांच्या शोधार्थ आॅपरेशन ‘मुस्कान’
By admin | Published: July 10, 2017 12:40 AM