दिलीप चव्हाण
गोंदिया : तालुक्यातील ग्राम बोटे येथे एका घराच्या कामादरम्यान २९४ पांढऱ्या रंगातील धातूची २९४ नाणी आढळून आली आहेत. ही नाणी पांढऱ्या रंगाची असल्याने गावात चांदीची नाणी सापडल्याची चर्चा सुरू झाली आहे.
प्रभाबाई शालीकराम शहारे (वय ७०) यांचे मातीचे जीर्ण घर तोडण्याचे काम सुरू असताना भिंतीतून टिनाची जीर्ण पेटी मिळाली. त्यात सन १८९० ते १९५० वर्ष आणि प्रिन्स लिहिलेली १ रुपयाची रुपेरी धातूची २९४ नाणी आढळून आली. ही नाणी खासगी घराच्या भिंतीत आढळून आल्याने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली नव्हती; परंतु लाला शहारे यांनी शनिवारी (दि.१६) पोलिसांत नाणी मिळाल्याची तक्रार दाखल करताच पोलिसांनी २९४ नाणी जप्त केली आहेत.
प्रभाबाई शहारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई चंद्रशेखर अंताराम नंदेश्वर यांना घरकुल मंजूर झाल्याने घरकुलाचे बांधकाम मातीचे जुने घर सोडून उर्वरित जागेत केले. जीर्ण झालेले मातीचे घर घरकुलाच्या समोर असल्याने हे घर पाडण्यासाठी ललित राऊत व संजय राऊत यांना कंत्राटावर काम दिले. त्यांनी ३ ऑक्टोबर रोजी जुने घर पाडण्याच्या कामाला सुरुवात केली.
घर कौलारू असल्याने इमला साहित्य काढले व भिंती पाडण्याचे काम सुरू केले. त्यादरम्यान जमिनीपासून ५ फूटवरच्या भागातील भिंतीत टिनाची एक जीर्ण पेटी या मजुरांनी दिसली. त्यांनी चंद्रशेखर नंदेश्वर यांना या पेटीची माहिती दिली. चंद्रशेखर नंदेश्वर यांनी भिंतीतून पेटी बाहेर काढताच नाणी खाली पडली. ही नाणी रुपेरी म्हणजेच पांढऱ्या रंगाची (धातूची) असून त्यावर प्रिस १ रुपया इंडिया सन १८९० ते १९५० असे आढळले.
त्यातील एका नाण्याचे वजन केल्यावर १० ते १२ ग्राम वजनाचे भरले. ही नाणी पांढऱ्या रंगाची असल्याने चांदीची नाणी मिळाल्याची चर्चा बोटे गावात पसरली; परंतु नाणी मिळाल्याची माहिती पोलिसांत देण्यात आली नव्हती. पांढऱ्या रंगाची जुने नाणी मिळाल्याची माहिती नागपूर निवासी लाला कान्हु शहारे यांना होताच वाटणीत हिस्सा घेण्याकरिता ते गावी आले. ती २९४ नसून ६०० आहेत. उर्वरित नाणी दाखव, असा तगादा चंद्रशेखर नंदेश्वर यांना लाला शहारे यांनी लावला असता जुने घर पाडण्याचे काम करणाऱ्या ललित राऊत व संजय राऊत यांना बोलावून विचारणा करण्यात आली; परंतु लाला शहारे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी शनिवारी (दि.१६) चंद्रशेखर नंदेश्वर यांच्या विरोधात गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करीत चंद्रशेखर नंदेश्वर यांच्याजवळील २९४ नाणी जप्त केली. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
नाणी चांदीचीच असल्याची गावात चर्चा
नाणी १८९० ते १९५० या वर्षातील असल्याने ती चांदीचीच असावीत, तसेच आजच्या बाजारभावाप्रमाणे लाखांच्या जवळपास किमतीची आहेत, अशी चर्चा परिसरात होत आहे. नेमके हे कोणत्या धातूचे आहेत हे तपासणी झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. असे असले तरीही नाणी मिळाल्याच्या घटनेमुळे सध्या हाच विषय सर्वांच्या तोंडी आहे.