गोंदिया : घरी कुणीही नसल्याची संधी साधून भरदिवसा झालेल्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीतील ३ घरफोड्या उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणांत पोलिसांनी ४ आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा दोन लाख १० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.
रामनगर पोलीस ठाण्यांतर्गत कन्हारटोली परिसरातील रहिवासी हेमंतलाल नेतलाल लिल्हारे यांच्या घरातून २२ जानेवारी रोजी, बसंतनगर निवासी सविता सुरेंद्र उखरे यांच्या घरातून २७ जानेवारी रोजी तर रिंगरोड गाडगेनगर निवासी अजय हौशिलाल मिश्रा यांच्या घरातून ३० जानेवारी रोजी भरदिवसा दाराचे कुलूप व कडी तोडून रोख व दागिने लंपास करण्यात आल्याची घटना घडली होती. प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये प्रकरण नोंद करण्यात आले आहे. एका मागे एक घडत असलेल्या घरफोडीच्या घटनांना बघता स्थानिक गुन्हे शाखा व रामनगर पोलीस या प्रकरणांना घेऊन तांत्रिक पद्धतीने तपासाला लागले होते. अशात त्यांनी संशयावरून अक्षय दिनेश गुप्ता (२२, रा. नवी दिल्ली), उमेशचंद्र ऊर्फ राहुल रमेशचंद्र मिश्रा (४२, हमु. नवी दिल्ली) व अनिल चु्न्नीलाल बोरकर (३४, रा. साकोली, भंडारा) यांना ताब्यात घेतले.
या तिघांची सखोल चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. एवढेच नव्हे तर चोरीचा काही माल विजय प्रल्हाद दयानी (रा. रामनगर) याला विकल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी विजय दयानी यालाही अटकेत घेतले आहे. एवढेच नव्हे तर पोलिसांनी चोरीतील दोन लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.