कपिल केकतलोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील २ वर्षांपासून जगाला लागलेले कोरोनाचे ग्रहण अद्याप सुटलेले नाही. दोन लाटांनी कहर केल्यानंतर तिसरी लाट आताही आपला कहर करीत आहे. अशात सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला कोरोना लसींचा बूस्टर डोस लावण्याचे शासनाचे आदेश होते. त्यानुसार जिल्ह्यात १०५५८ आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला डोस देण्याचे उद्दिष्ट होते; मात्र यातील ३०९० कर्मचारी व वर्कर्सने अद्याप बूस्टर डोस घेतला नसल्याचे दिसत आहे. कोरोनाची पहिली लाट आली तेव्हा लढण्यासाठी कुणाकडेही काहीच शस्त्र नव्हते. अशात कोरोनाने कित्येकांचा जीव घेतला. दुसरी लाट आली तेव्हा लस आली होती; मात्र व्यापक प्रमाणात लसीकरण न झाल्याची संधी साधून कोरोनाने डाव साधून घेतला व पहिल्या लाटेपेक्षा जास्त जीवितहानी केली; मात्र त्यानंतर कोरोनाला आपले पाय पसरू द्यायचे नाही हे ठरवून देशात लसीकरण मोहीम राबविली जात आहे. या लसीकरण मोहिमेंतर्गत आता १५ वर्षांपेक्षा पुढे सर्वांचे लसीकरण केले जात असून मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. या लसीकरणाचे फलित असे की, तिसरी लाट आली; मात्र लसीचे कवच असल्याने ती सर्दी, खोकला व तापावरच मर्यादित राहिली आहे; मात्र सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सच्या बाबतीत धोका पत्करणे योग्य नसल्याने शासनाने बूस्टर डोस देण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात १०५५८ कर्मचारी व वर्कर्सच्या बूस्टर डोसचे उद्दिष्ट होते; मात्र गुरुवारपर्यंत (दि.१०) यातील ७४६८ कर्मचारी व वर्कर्सला बूस्टर डोस देण्यात आला आहे. तर ३०९० कर्मचारी व वर्कर्स अद्याप उरले आहेत.
गोंदिया तालुका पिछाडीवर - गोंदिया तालुका कोरोनाचा सुरुवातीपासूनच हॉटस्पॉट राहिला आहे. मात्र असे असतानाच तालुकावासीच सर्वात जास्त लापरवाहीने वागताना दिसत आहेत. यात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स दिसून येत आहेत. कारण, तालुक्यात ५७८३ कर्मचारी टार्गेट असूनही ३८८१ जणांनीच बुस्टर डोस घेतला आहे. म्हणजेच, १९०२ जणांनी डोस टोलवला आहे. येथेच आमगाव तालुका आघाडीवर असून ६९९ कर्मचारी व वर्कर्समधील ६९८ जणांनी डोस घेतला असून फक्त १ जण उरला आहे.