गोंदिया : कत्तलखान्यात जनावरांना वाहून नेणाऱ्या तीन वाहनांना नवेगावबांध पोलिसांनी ७ फेब्रुवारीच्या सकाळी पकडले. एक वाहन पांढरवानी येथे तर दोन वाहन नवेगावबांध ते कोहमारा रस्त्यावर पकडले. पांढरवानी रोडवर ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास पिकअप एमएच ३६ ए.ए. ३०११ या वाहनात ३ जनावरे डांबून कत्तलीकरिता घेऊन जात असताना नवेगावबांध पोलिसांनी ते वाहन पकडले.
ही कारवाई पोलिस शिपाई महेश निकुरे यांनी केली आहे. आरोपी नितेश रामकृष्ण राऊत (२९) रा. पळसगाव ता. साकोली जि. भंडारा याच्याविरुद्ध नवेगावबांध पोलिसात महाराष्ट्र पशू संरक्षण कायदा कलम ५ (अ) (ब), ९ सहकलम ११ (१)(ड) (ई) (फ) प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदाअन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत ३० हजार रुपये तर वाहनाची किंमत ७ लाख रुपये असा एकूण ७ लाख ३० हजार रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आहे.
तपास पोलिस उपनिरीक्षक भोसले करीत आहेत, तर दुसरी कारवाई नवेगावबांध ते कोहमारा जाणाऱ्या मार्गावर ७ फेब्रुवारीच्या पहाटे ४:३० वाजता करण्यात आली. बोलेरो पिकअप एम.एच.३५ के ४०९९ यामध्ये ५ जनावरे डांबून वाहतूक केली जात होती, तर एम.एच.४६ ए.एफ.६०५८ या वाहनात ५ जनावरे डांबलेली होती. या दाेन्ही वाहनासह जप्त करण्यात आलेल्या जनावरांची किंमत १७ लाख रुपये सांगितली जाते. नवेगावबांध पोलिसांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी कारवाई करून २४ लाख ३० हजारांचा माल जप्त केला आहे. आरोपी संदेश एकनाथ फुल्लुके (४२) रा. मुरपार, ता. सडक-अर्जुनी व विकास आनंदराव भोंडे (२६) रा. सातलवाडा जि. साकोली जि. भंडारा या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस हवालदार राजू मडावी यांनी केली आहे. तपास पोलिस नाईक गौरीशंकर कोरे करीत आहेत.