लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध व भरनोली ग्रामपंचायतची निवडणूक येत्या १६ ऑक्टोबर रोजी होत आहे. निवडणूक प्रक्रियेदरम्यान नामांकन अर्जांची छाननीनंतर सदस्य पदासाठी दोन्ही ग्रामपंचायतमधील सदस्य पदासाठी ३० नामांकन अर्ज तर दोन्ही ग्रामपंचायतच्या सरपंच पदासाठी ८ नामांकन अर्ज वैध ठरले.तालुक्यातील सिरेगावबांध व भरनोली या दोन ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे. यावेळी सरपंच थेट गावातील मतदारांकडून निवडल्या जाणार आहे. दोन्ही गावात ग्रामपंचायत रणसंग्राम चरम सीमेला पोहोचलेला आहे. यातील एका ग्रामपंचायतच्या ९ सदस्यांची निवड अविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.सिरेगावबांध ग्रामपंचायतविविध नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून विविध पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या सिरेगावबांध ग्रामपंचायतची ओळख जिल्ह्यात आगळी-वेगळी आहे. यावेळी सरपंच पद अनुसूचित जाती महिलासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. थेट जनतेमधून सरपंचाची निवड केली जाणार आहे. छाननीनंतर कालिदा मेश्राम, मंदाकिनी चवरे, सारंग चिमणकर, यशोधरा डोंगरवार, कविता खोब्रागडे या ५ जणांचे नामांकन सरपंचासाठी वैध ठरले. तीन प्रभागात नऊ ग्रामपंचायत सदस्य राहणार आहेत. ९ सदस्य पदासाठी ११ नामांकन अर्ज वैध ठरले. एक नामांकन अवैध ठरला. ग्रामपंचायतच्या तीन प्रभागातील ९ सदस्यांच्या निवडीसाठी मतैक्य घडवून आणून बिनविरोध निवडणूक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे. पण सरपंच पदाची निवडणूक अटळ आहे. सरपंच पदाचे चित्र येत्या शुक्रवारी (दि.३०) नामांकन मागे घेण्याच्या दिवशी स्पष्ट होईल. ५०९ पुरुष तर ४८० महिला असे ९८९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.भरनोली ग्रामपंचायतभरनोली ग्रामपंचायतचे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव आहे. तीन प्रभागातून ९ ग्रामपंचायत सदस्य निवडले जाणार आहेत. बुधवारी झालेल्या छाननीनंतर सरपंच पदासाठी सुनीता कवडो, सुषमा गावळे, अनिता हारामी यांचे ३ नामांकन वैध ठरले. ९ ग्रामपंचायत सदस्यासाठी १९ जणांचे नामांकन अर्ज वैध ठरले. १६ ऑक्टोबरला होणाऱ्या निवडणुकीत ६७२ पुरुष तर ६७२ महिला असे १३४४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. नामांकन मागे घेण्याच्या दिवसानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार.
चुरस वाढणारथेट गावातील मतदारांकडून सरपंचपदाची निवडणूक होत असल्याने गावात कमालीची चुरस निर्माण झाल्याचे चित्र आहे. सरपंच पदाच्या शर्यतीमधील उमेदवारांचा चांगलाच कस लागणार आहे. मतदारांना सरपंच तसेच प्रभागातील सदस्यांना मतदान करण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही गावातील सरपंच पदाची निवडणूक कमालीची रंगतदार होण्याची शक्यता आहे.
निवडणूक यंत्रणा सज्ज- तालुक्यातील सिरेगावबांध व भरनोली या दोन ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रियेसाठी तहसील कार्यालयातील निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार विनोद मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार (निवडणूक) गणेश सोनुने, निखिल धारगावे, विजय कोकाटे निवडणूक प्रक्रिया राबवित आहेत. सिरेगावबांध ग्रामपंचायत निवडणूक संबंधांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस.एस. शिरभाते तर सहायक म्हणून आर.व्ही. शेंडे तसेच भरनोली ग्रामपंचायतचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डी.एस. लोहबरे तर सहायक म्हणून के.बी. चाचेरे काम पाहत आहेत.