गोंदिया : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दररोज वधारत चालली असून शुक्रवारी (दि.२१) त्यात ३१ रुग्णांची भर पडल्यानंतर जिल्ह्याने ‘हॅटट्रिक’ केली आहे. यामुळे जिल्ह्यात आता ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १०१ झाली असून कोरोनाचा विषय दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे.
देशासह राज्यातच कोरोना परत एकदा फोफावला असून त्यात आता जिल्ह्याचाही समावेश झाला आहे. जिल्ह्यात दररोज बाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. हेच कारण आहे की, काही मोजक्याच दिवसांत जिल्ह्यात बाधितांची संख्या शंभरी पार झाली आहे. यामध्ये सर्वाधिक ३६ रुग्ण गोंदिया तालुक्यातील असून गोंदिया तालुका परत एकदा कोरोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. सध्या ॲक्टिव्ह असलेल्या रुग्णांमधील तीन रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात भरती असून ९८ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. २२३ चाचण्यांमध्ये हे ३१ बाधित आढळले असून आता पॉझिटिव्हिटी रेशो वाढून १३.९ झाला आहे.