गोंदिया : देशाला भ्रष्टाचाराने पोखरले असताना यातून गोंदियाजिल्हा परिषद कशी सुटणार? गोंदिया जिल्हा परिषदअंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लाच घेतल्यामुळे त्यांना तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगातून सुटल्यानंतर काही दिवस निलंबित राहिलेले सर्वच ३१ कर्मचारी सेवेत पुनर्स्थापित झाले आहेत.
गोंदिया जिल्हा परिषदेतील ११ विभागांतील ३१ कर्मचारी लाच घेताना पकडले गेले. लाच घेताना रंगेहाथ पकडल्यावर त्या कर्मचाऱ्यांना अटक करून तुरुंगात टाकण्यात आले. तुरुंगात राहिलेल्या कर्मचाऱ्यांना निलंबित करून त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली. यात काहींची विभागीय चौकशी झाली तर अनेकांची विभागीय चौकशी सुरू असतानाच त्यांना पुनर्स्थापित करण्यात आले.
सर्वाधिक लाच घेणारे सामान्य प्रशासन विभागातील
गोंदिया जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या ११ विभागांतील ३१ कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडण्यात आले. यात ११ कर्मचारी हे सामान्य प्रशासन विभागातील आहेत. पंचायत विभाग ८, वित्त विभाग ४, ग्रामीण पाणीपुरवठा व महिला बाल कल्याण विभागातील प्रत्येकी दोन, शिक्षण, लघुपाटबंधारे, पशुसंवर्धन, बांधकाम विभागातील प्रत्येकी एक कर्मचारी आहे.
२१ कर्मचाऱ्यांचा विभागीय चौकशी अहवाल प्राप्त
गोंदिया जि.प.तील लाच घेताना पकडण्यात आलेल्या ३१ पैकी २१ कर्मचाऱ्यांच्या विभागीय चाैकशी गोंदिया जि.प.ला प्राप्त झाल्या आहेत.
१० कर्मचाऱ्यांचा चौकशी अहवाल अप्राप्त
गोंदिया जि.प.तील लाच घेताना पकडण्यात आलेल्या ३१ पैकी १० कर्मचाऱ्यांच्या विभागीय चाैकशी गोंदिया जि.प.ला अप्राप्त आहेत.
४ जणांची खुर्ची सुटेना
लाच स्वीकारताना पकडल्या गेलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांना तातडीने निलंबित करण्यात यावेत, असे आदेश नगरविकास विभागाने १६ मार्च रोजी काढले आहेत. तरीही गोंदिया जिल्ह्यातील ४ लाचखोर अजूनही खुर्चीवर कायम आहेत. त्यात एक जि. प., एक शिक्षण व क्रीडा, एक महसूल व भूमिअभिलेख तर एक नगरविकास विभागाच्या कर्मचाऱ्याचा समावेश आहे.
काय आहे नवा आदेश?
लाचलुचपत प्रकरणात अटक झाल्याचा कालावधी ४८ तासांहून अधिक असल्यास अटकेच्या दिनांकापासून निलंबनाचे आदेश काढणे अनिवार्य आहे. निलंबनाची प्रकरणे वगळून अन्य प्रकरणात लाचेचा सापळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपचारी अधिकारी, कर्मचारी यांना तत्काळ निलंबित करावे. प्रकरणाचे गांभीर्य व पुराव्यांची सद्यस्थिती पाहून तत्काळ निलंबनाबाबत निर्णय घेण्यात यावा. केवळ अटक झालेली नाही, या कारणास्तव सरसकट सर्व प्रकरणी निलंबन नाकारण्यात येऊ नये.
लाचखोरीत ग्रामविकास विभाग नंबर वन
लाचखोरीत गोंदिया जिल्ह्यात ग्रामविकास विभाग आघाडीवर आहे. मागील तीन वर्षांत १३ लाच स्वीकारल्याची प्रकरणे आहेत. त्यात सन २०१९ मध्ये चार, २०२० मध्ये पाच, तर सन २०२१ मध्ये चार जणांचा समावेश आहे. लाच स्वीकारण्यात पोलीस विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. सन २०२२ मध्ये पोलीस लाच स्वीकारण्यात आघाडीवर आहेत.