नागपूर विभाग शिक्षक मतदार संघ : चौकशी करून कारवाई करा तिरोडा : महाराष्ट्र राज्य विधान परिषद नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक येत्या ३ फेब्रुवारीला होत आहे. त्यासाठी गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याची मतदार यादी भाग-५६, ७ जानेवारी २०१७ ला प्रसिध्द करण्यात आली. त्यात ३१ शिक्षकांची नावे न आल्याने ते येत्या निवडणुकीत मतदानापासून वंचित राहणार आहेत. तिरोडा तालुक्यात मतदार यादी बनविण्यासाठी मुख्याध्यापकांना पत्र दिले. त्यानुसार मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील शिक्षकांचे फार्म भरून यादी तहसील कार्यालयात पाठविली. तिरोडा तहसील कार्यालयात ४५७ फार्म आलेत. त्यापैकी ४१७ मतदारांची नावे मतदार यादीत आले. सहा टायपिंगचे शिक्षक व रामटेकवरून एक फार्म आले. त्या फार्मवर मुख्याध्यापकांचा शाळेचा शिक्का नसल्याने तर दोन फार्म दोनदा भरल्याने रद्द झाले. तर ३१ फार्म इतर कारणे, सर्च न होणे त्यामुळे मतदार यादीत समाविष्ट झाले नाही. मुख्याध्यापकांनी पाठविलेली यादी ग्राह्य मानून यादीत नाव समाविष्ट होणे आवश्यक होते. तालुक्यातून ३१ मतदार मतदानापासून वंचित राहणार आहेत. यात भागवत राऊत, स्वप्नलता भगत, भरतलाल बिसेन, माला अंबादे, ज्ञानेश्वर खांडेकर, भिवरामजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विद्यालय वडेगाव; अरविंद सिंगनजुडे, प्रमोद तिर्थकार, संजय काळबांधे, विजय भांडारकर, विलास नान्हे, भावराव नागमोती, शालिनी पौणीकर, दिलीप झाडे, सुभाष विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मुंडीकोटा; शुभांगिनी चव्हाण, खेमलता वानखेडे, सुनील दिघोरे हे जिल्हा परिषद हायस्कूल तिरोडा; शिलान शेंडे, विद्या बोरकर, मनराज बघेले, शारदा कांबळे हे मानवता हायस्कूल बेरडीपार; शुभम हरिणखेडे, ज्ञानेश्वर करवाडे हे गणेश हायस्कूल गुमाधावडा; अश्विनी कुरसुंगे, जयकांत मरकाम, सेवकराम भगत, प्रेमनाथ चौधरी, किर्ती चव्हाण हे जीईएस हायस्कूल नवेझरी; आय.जे. पांडे हे सी.जे. पटेल कॉलेज तिरोडा, भागवत ठाकरे हे गिरजाबाई कन्या हायस्कूल तिरोडा व विजय टेंभुर्णीकर हे शासकीय आश्रम शाळा कोयलारी यांचा समावेश आहे. सदर शिक्षकांचे नाव मतदार यादीत समाविष्ट का झाले नाही. तिरोडा तहसीलची यादी बनविली तेव्हा त्यांची नावे यादीत समाविष्ट का करता आले नाही, त्याबाबत संबंधित शिक्षक वा मुख्याध्यापकांना कोणतेही लिखित पत्र का दिले नाही, तहसीलदार रविंद्र चव्हाण यांनी याबाबत कोणतीच कार्यवाही केली नसल्याचे समजते. या प्रकरणात जिल्हाधिकारी यांनी तत्काळ कार्यवाही करून दोषींवर योग्य कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेस शिक्षक सेलचे जिल्हा अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मतदार यादीत नावे न येणाऱ्या मतदारांना वंचित ठेवल्याने काय कार्यवाही होते, याकडे तालुक्यातील शिक्षकांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)
३१ शिक्षक राहणार मतदानापासून वंचित
By admin | Published: February 02, 2017 1:00 AM