नरेश रहिले ल्ल गोंदियाबालकांना सुदृढ आरोग्य सेवा देण्याबरोबरच त्यांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी बालपणापासूनच अंगणवाडीत दाखल केले जाते. परंतु बालमनावर संस्कार टाकणाऱ्या या अंगणवाड्या चिमुकल्यांचा कर्दनकाळ ठरू शकतात. गोंदिया जिल्ह्यातील ३१३ अंगणवाड्या आजघडीला जीर्णावस्थेत आहेत. या अंगणवाड्यांमध्ये शिक्षण घेणाऱ्या चिमुकल्यांना जीव मुठीत घेऊन ज्ञानार्जन करावे लागत आहे, अशी माहिती स्वत: महिला व बाल कल्याण विभागाला प्राप्त झाली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार हे वास्तव पुढे आले आहे. जिल्ह्यात १ हजार ५४७ अंगणवाडी व १३२ मिनी अंगणवाडी आहे. यात ३६ अंगणवाड्यांसाठी इमारत नसून आठ अंगणवाड्यांसाठी निधी मिळाला आहे. प्रत्येक आंगणवाडीला सहा लाख रूपये इमारत तयार करण्यासाठी देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त २८ अंगणवाड्या इमारतीविना आहेत. तर ३१३ अंगणवाड्या जर्ण झाल्या आहेत. यात आदिवासी दुर्गम भाग (टीएसपी) च्या १०५ तर इतर आदिवासी क्षेत्र (ओटीएसपी) च्या २०८ अंगणवाड्यांचा समावेश आहे. यातच ११६ दलितवस्तीतील अंगणवाड्यांचा समाविष्ट आहेत. आदिवासी दुर्गम क्षेत्रात ५० टक्के आदिवासी आहेत. इतर आदिवसी क्षेत्रात ५० टक्के आदिवासी समाज आहे. दलित वस्तीत असणाऱ्या ११६ अंगणवाड्यांचीही अवस्था जिर्ण झाली आहे. या आंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांना धोका पत्करूनच दिवस घालवावा लागतो. अंगणवाड्यांची स्थिती अत्यंत वाईट असल्यामुळे कोणत्या आंगणवाडीत बालकांना ठेवता येईल व कोणत्या ठिकाणी ठेवता येणार नाही यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या महिला व बाल कल्याण विभागाने जि.प. च्या कार्यकारी अभियंत्यांना पडताळणी करण्याचे पत्र दिले. या पडताळणीनंतर कोणत्या अंगणवाड्या मरणासन्न आहेत याची माहिती ते देतील.४महिला व बाल कल्याण मंत्रालयाने जिल्ह्यासाठी ७६ अंगणवाड्यांना मंजूरी दिली आहे. यात गोंदिया-१ प्रकल्प कार्यालय अंतर्गत ८, गोंदिया-२ साठी ३, देवरी ५, तिरोडा ३३, गोरेगाव ६, आमगाव ६, सडक-अर्जुनी १०, अर्जुनी-मोरगाव ३ व सालेकसासाठी २ मिनी अंगणवाड्यांना मंजुरी देण्यात आली.अंगणवाड्या जीर्णावस्थेत असल्याने त्या जीर्ण इमारतींची पाहणी करण्याचे पत्र कार्यकारी अभियंत्यांना देण्यात आले आहे. त्यानंतर नवीन आंगणवाड्या बांधल्या जाणार आहेत.- अंबादे, उपमुख्य कार्यपालन अधिकारी, महिला व बाल कल्याण विभाग, जि.प.गोंदिया.
३१३ अंगणवाड्या मरणासन्न
By admin | Published: March 23, 2016 2:01 AM