कपिल केकत (लोकमत विशेष)
गोंदिया : भंडारा येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात घडलेल्या आगीच्या घटनेने अवघ्या देशालाच हादरवून सोडले आहे. अशात ‘लोकमत’ने शहरातील किती हॉस्पिटल्स अग्निरोधक यंत्रणेने सज्ज आहेत जाणून घेतले. यात शहरातील शासकीय व खासगी अशा ३३ हॉस्पिटल्समध्ये अग्निरोधक यंत्रणा बसविण्यात आल्याची माहिती मिळाली. अग्निशमन विभागाकडून याची नियमित पाहणी केली जात असून आता उर्वरितांसाठी आता मोहीम छेडली जाणार आहे.
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत १० बाळांचा बळी गेल्याने अवघ्या देशातच या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यापेक्षा तळपायाची आग मस्तकाला जाण्याची बाब म्हणजे, हा प्रकार शासकीय जिल्हा रुग्णालयात घडला असून या रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले नसणे ही जिल्हा प्रशासनाच्या पंगू कार्यप्रणालीची प्रचिती देत आहे. हजारो नागरिकांच्या सततच्या वर्दळीचे जिल्हा रुग्णालय अग्निरोधक यंत्रणेचे फायर ऑडिट न होणे ही बाब अत्यंत गंभीर आहे. विशेष म्हणजे, अग्निरोधक यंत्रणेकडे करण्यात आलेल्या दुर्लक्षितपणाचा फटका चिमुकल्या जीवांना भोगावा लागला आहे. शासकीय असो वा खासगी इमारती त्यात मॉल्स, दवाखाने, कोचिंग वा अन्य व्यावसायिक प्रतिष्ठांनाचा समावेश असो जेथे नागरिकांची ये-जा असते त्यांना फायर ऑडिट करणे गरजेचे आहे. यासाठी अग्निशमन विभागाकडून त्यांच्यावर नजर ठेवली जाते व त्यांच्याकडूनच हे फायर ऑडिट करावे लागते. त्यानुसार, शहरातील अग्निशमन विभागाकडून शासकीय व खासगी अशा एकूण ३३ हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट करण्यात आले असून ते अग्निरोधक यंत्रणेने सज्ज असल्याचे अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, अग्निशमन विभागाकडून अशा हॉस्पिटल्सवर नजर ठेवली जात आहे.
--------------------
बहुतांश हॉस्पिटल्स अग्निरोधक यंत्रणेने सज्ज
शहरात एमबीबीएस डॉक्टर्सचे सुमारे ३० हॉस्पिटल्स असून बीएएमएस डॉक्टर्सचे सुमारे ८ हॉस्पिटल्स आहेत. अग्निशमन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३३ हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट झाले असून यात शासकीय रुग्णालयांचाही समावेश आहे. म्हणजेच, बहुतांश हॉस्पिटल्सचे फायर ऑडिट झाले असून यात उरलेल्या काहींना आता सज्ज करवून घेतले जाणार आहे.