आपत्ती व्यवस्थापनास उपयुक्त : १२ किमीपर्यंत मिळणार अचूक हवामानलोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी हवामानाचा सल्ला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यास महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना व आपत्ती व्यवस्थापनासदेखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.कारंजा येथील कृषी चिकित्सालयात माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीचे औचित्य साधून पालकमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते हवामानाचा वेध घेणाऱ्या स्वयंचिलत हवामान केंद्राचे उदघाटन करण्यात आले. त्याप्रसंगी सदर माहिती देण्यात आली.या वेळी जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे, जि.प.चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी(सीईओ) मंगेश मोहिते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे, आत्माचे प्रकल्प संचालक हिंदूराव चव्हाण, कृषी विकास अधिकारी वंदना शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी नंदकिशोर नाईनवाड, आत्माचे उपसंचालक सराफ, तालुका कृषी अधिकारी मंगेश वावधने यांची उपस्थिती होती. हवामानाची अचूक माहिती या स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे मिळणार आहे. हवामानातील बदलामुळे शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागतो. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट, अवकाळी पावसामुळे होणारे पिकांचे नुकसान, या नैसर्गिक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. हे नुकसान टाळण्यासाठी हे स्वयंचलित हवामान केंद्र उपयुक्त ठरणार आहे. सोबतच अचूक माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. या माहितीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या हवामानविषयक घटकांची माहिती वेळीच उपलब्ध होणार आहे. कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे माहिती देण्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. या हवामान केंद्रामुळे १२ किलोमीटर परिसरातील अचूक हवामानाची नोंद दर १० मिनिटांनी उपलब्ध होणार आहे. या हवामान नोंदीमध्ये पर्जन्यमान, तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा या वातावरणातील घटकांचे मोजमाप करण्यात येणार आहे. जमा झालेली हवामान विषयक माहिती, पीक विमा योजना, पीक विषयक सल्ला, हवामानविषयक संशोधन व इतर कल्याणकारी योजना राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी विभाग व स्कायमेट वेदर सर्व्हिसेस यांच्या संयुक्त भागीदारीतून स्वयंचलित हवामान केंद्र कार्यान्वित झाले आहे. आता जिल्ह्यातील ३३ महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी हवामानाचा सल्ला व नैसर्गिक आपत्तीची पूर्वकल्पना उपलब्ध होईल. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनासदेखील हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे. स्वयंचलित हवामान केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमाला कृषी विभागाचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
३३ महसूल मंडळात होणार हवामान केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2017 1:24 AM