बोरगाव/डवकी (गोंदिया) : पिकअप वाहनात बसून रोवणीच्या कामासाठी जात असताना वाहकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन उलटल्याने ३३ महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी दहा वाजताच्या सुमारा देवरी -आमगाव मार्गावरील डवकी जवळ घडली. जखमी महिलांवर देवरी येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करुन गोंदिया येथील शासकीय महाविद्यालयात रेफर करण्यात आले.
प्राप्त माहितीनुसार देवरी तालुक्यातील बोरगाव डवकी येथील महिला मजूर बुधवारी सकाळी रोवणीच्या कामासाठी सराईटोला येथे पिकअप वाहनातून बसून जात होता. दरम्यान बोरगावपासून काही अंतरावर गेल्यावर पिकअप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. वाहन दोन तिनदा पलटी झाल्याने पिकअपमध्ये बसलेल्या ३३ महिला जखमी झाल्या. यापैकी ६ महिला गंभीर जखमी असून त्यांना तातडीने गोंदिया येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. दरम्यान या मार्गावरुन जाणाऱ्या वाहन चालकांनी अपघातग्रस्तांच्या मदतीला धावून जात जखमींना रुग्णालयात दाखल केले. तसेच या घटनेची माहिती देवरी पोलिसांनी दिली. माहिती मिळताच देवरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून पिकअप वाहन चालकाला ताब्यात घेतले.
छोट्या पिकअप वाहनातून तब्बल ३३ महिलांची वाहतूक
छोट्या पिकअप मालवाहू वाहनातून वाहन चालकांने तब्बल ३३ महिलांना बसवून त्यांची वाहतूक करुन त्यांचा जिव धोक्यात घातला. मालवाहू वाहनातून अशी वाहतूक करता येत नसताना सुध्दा नियमांना धाब्यावर बसवून ही वाहतूक केली जात असल्याची माहिती आहे.