लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे नाना पंचबुद्धे, भाजपा-शिवसेना युतीचे सुनील मेंढे, बसपाच्या विजया नंदुरकर यांच्यासह ३३ उमेदवारांनी सोमवारी आपले नामांकन दाखल केले. राष्ट्रवादी आणि भाजपाने रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले. भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र पटले आणि भाजपाचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी नामांकन दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. नामाकंन प्रक्रियेदरम्यान पोलिसांनी संपूर्ण शहरात तगडा बंदोबस्त लावला होता.राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने येथील जलाराम सभागृहात सकाळी ११ वाजता खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनात सभा घेण्यात आली. यावेळी मंचावर खासदार मधुकर कुकडे, आमदार गोपालदास अग्रवाल, आमदार प्रकाश गजभिये,माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार, माजी आमदार राजेंद्र जैन, दिलीप बन्सोड, आनंदराव वंजारी, अनिल बावनकर, रामरतन राऊत, विजय शिवणकर, सुनील फुंडे, धनंजय दलाल, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, गोंदिया जि.प. अध्यक्ष सीमा मडावी, जिया पटेल, नरेश माहेश्वरी, प्रेमसागर गणवीर, रामलाल चौधरी, पुरूषोत्तम कटरे, पंचम बिसेन, सीमा भुरे, विशाल शहारे, कल्याणी भुरे यासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. भंडारा व गोंदिया जिल्ह्यातील आलेले हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यानंतर जलाराम चौकातून त्रिमूर्ती चौकापर्यंत रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये बैलबंडी व लोकनाट्य आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. शहरातील मुख्य चौरस्त्यांसह अन्य ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. १.४५ वाजताच्या सुमारास मिरवणूक त्रिमुर्ती चौकात पोहोचताच खासदार पटेल यांच्या नेतृत्वात जोरदार घोषणा देण्यात आल्या.दुपारी २ वाजताच्या सुमारास नाना पंचबुद्धे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत खासदार प्रफुल पटेल, मधुकर कुकडे, माजी आमदार अॅड. आनंदराव वंजारी, जिया पटेल यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला.भाजपा-शिवसेना युतीचे उमेदवार नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी दुपारी २ वाजताच्या हजारो समर्थकांसह रॅली काढून नामांकन दाखल केले. तत्पूर्वी शास्त्रीनगर चौकातील साखरकर सभागृहात सभा घेण्यात आली.यावेळी सभेला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार अॅड. रामचंद्र अवसरे, आमदार चरण वाघमारे, आमदार गिरीष व्यास, आमदार रामदास आंबडकर, माजी खासदार शिशुपाल पटले, डॉॅ.उपेंद्र कोठेकर, अरविंद शहापूरकर, म्हाडाचे सभापती तारिक कुरैशी, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, रमेश कुथे, गोंदिया भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, भंडाराचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष आसित बागडे आदी मान्यवर उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे व आ.परिणय फुके यांच्या मुख्य उपस्थितीत नगराध्यक्ष सुनील मेंढे यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी नामांकन अर्ज दाखल केले.नामांकन दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने होणारी गर्दी लक्षात घेता शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील त्रिमुर्ती चौकात येणारी प्रत्येक मिरवणूक थांबविण्यात येत होती. त्यासाठी या परिसरात बॅरिकेट्स लावून तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तसेच शहरातील गांधी चौक, मुस्लिम लायब्ररी चौक या परिसरातही पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. रॅलीच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलीस तैणात करण्यात आले होते. केंद्रीय राखीव दलाची कंपनीही शहरात तैनात करण्यात आली होती. नामांकन दाखल करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यातील आपापल्या पक्षाचे कार्यकर्र्ते आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मानकर, शहरचे ठाणेदार सुधाकर चव्हाण, कारधाचे गजानन कंकाळे आदींनी बंदोबस्त लावला होता.अपक्ष बंडखोरांचा बोलबालालोकसभेच्या निवडणुकीतही बंडखोरांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. भाजपचे माजी खासदार खुशाल बोपचे यांनी सोमवारी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली. यामुळे पक्षात खलबते व्हायला सुरूवात झाली आहे. त्याचसोबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच किसान गर्जनाचे संस्थापक राजेंद्र पटले यांनीही सोमवारी दुपारी १२ वाजता नामंकन अर्ज दाखल केला. भाजपमध्ये बंडखोरी होत असल्याचे प्रमुख चित्र आज पहावयास मिळाले. या दोन्ही उमेदवारांपैकी कुणालाही पक्षाने एबी फार्म दिलेला नाही. विशेष म्हणजे आम्ही उमेदवारी मागे घेण्यासाठी नाही तर निवडणूक लढण्यासाठी नामांकन अर्ज दाखल केला आहे, असे माध्यम प्रतिनिधींशी बोलायलाही ते विसरले नाही.राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्पजिल्हाधिकारी कार्यालय राष्ट्रीय महामार्गावर असल्याने आणि नामांकन दाखल करण्यासाठी वाहनांसह नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. शहरातही ठिकठिकाणी वाहने उभी असल्याने वाहतूक कोंडी दिसून येत होती. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंढी दुपारी १ वाजतापासून ते ४ वाजेपर्यंत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा शहरात लागल्याचे दिसत होते. साकोली मार्गावर गडेगावपर्यंत वाहनांची रांग लागली होती. तर नागपूर मार्गावर लांब रांग लागली होती. यामुळे वाहनधारकांची मोठे हाल झाले. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले जात होते. मात्र दुपारी ४ वाजेपर्यंत वाहतूक सुरळीत झाली नव्हती.
राष्ट्रवादी, भाजपासह ३४ उमेदवारांचे नामांकन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 10:20 PM
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात काँग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे नाना पंचबुद्धे, भाजपा-शिवसेना युतीचे सुनील मेंढे, बसपाच्या विजया नंदुरकर यांच्यासह ३३ उमेदवारांनी सोमवारी आपले नामांकन दाखल केले.
ठळक मुद्देभंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघ : राष्ट्रवादीचे नाना पंचबुद्धे व भाजपाचे सुनील मेंढे यांचे शक्ती प्रदर्शन