सर्व नगरसेवक खुश : नगर परिषदेत पहिल्यांदाच दिसले ‘आॅल ईज वेल’चे चित्र गोंदिया : गोंदिया नगर परिषदेचा कालावधी संपण्यासाठी अवघे ५ महिने शिल्लक असताना बुधवारी (दि.१०) झालेल्या बहुप्रतिक्षित आमसभेत कोणत्याही विषयावर वादविवाद झाला नाही. सर्व नगरसेवकांनी आमसभेसमोर आलेल्या ३५ पैकी ३४ विषयांवर सहमती दर्शवित त्याबाबतचे ठराव मंजूर केले. केवळ सिव्हील लाईनमधील प्राथमिक मराठी शाळा आणि हिंदी सेठ प्रताप प्राथमिक शाळा पटसंख्या कमी झाल्याने बंद करण्याला विरोध झाल्याने त्या कायम ठेवण्याचा निर्णय झाला. नगराध्यक्ष कशिश जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या आमसभेला मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्यासह न.प.उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, सभापती जितेंद्र पंचबुद्धे, श्रद्धा नाखले, शिला इटनकर, लता रहांगडाले, शोभा चौधरी आणि चार सोडून सर्व नगरसेवक हजर होते. जानेवारी महिन्यानंतर थेट आताच आमसभा झाल्यामुळे यात काय हंगामा होतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र कोणतेही वादाचे विषय आमसभेत चर्चेला न आणता सर्वसमावेशक विषय ठेवण्यात आले. सर्वच भागातील कामांना प्राधान्य देण्यात आल्यामुळे सर्वच नगरसेवक समाधानी दिसत होते. त्यामुळे पहिल्यांदाच नगर परिषदेच्या आमसभेत ‘आॅल ईज वेल’ असे चित्र दिसले. सभेत मंजूर झालेल्या प्रमुख विषयांमध्ये रेल्वे स्टेशनजवळील सरकारी तलावाचे सौंदर्यीकरण करून तिथे बोटींग सुरू करण्यासाठी हा तलाव नगर परिषदेकडे हस्तांतरित करावा, साई मंदिरामागील नाग तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी तो तलाव जिल्हा परिषदेच्या ताब्यातून न.प.कडे हस्तांतरित करावा, केटीएस रुग्णालयात कुंवर तिलकसिह नागपुरे यांचा पुतळा उभावावा, घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत कचरा कुंड्या खरेदीसाठी निविदा मंजुरी तसेच १२० नग लोखंडी कंटेनर खरेदी करण्याचा प्रस्ताव मंजुर केला. नगर परिषदेकडून तयार केल्या जात असलेल्या नाट्यगृहाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देऊन छत्रपतींचा पुतळा तिथे उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. नगर परिषदेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमीत वेतनश्रेणीत कायम करण्यासाठी शासनस्तरावर शिफारस करण्याचा ठराव मंजुर करण्यात आला. नगर परिषदेतील परवाना विभागातील जुने रेकॉर्ड निरस्त करणे, शहरात असलेल्या दुकानांचे शॉप अॅक्ट लायसन्सकरिता सर्व्हेक्षण करणे, संकल्प अपंग व निराधार बहुउद्देशिय शिक्षण संस्थेच्या अर्जाप्रमाणे त्यांना मालविय वॉर्ड येथील न.प.शाळेची जागा भाडेतत्वावर देणे, नगर परिषदेतर्फे प्रस्तावित वैशिष्ट्यपूर्ण योजनेतील विद्युत विभागातील कामाकरिता १० टक्के न.प. लोकवर्गणी हिस्सा नगर परिषदेच्या फंडातून भरणे आदी मुद्द्यांना मंजुरी देण्यात आली. (जिल्हा प्रतिनिधी) हनुमान मंदिराजवळ उभारणार कमान या आमसभेत अध्यक्षांच्या परवानगीने वेळेवर काही विषय घेण्यात आले. त्यात प्रभाग क्रमांक ६ चे नगरसेवक अशोक (गप्पू) गुप्ता यांनी केलेल्या अर्जानुसार सिव्हील लाईनमधील हनुमान मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर हनुमानद्वार (कमान) उभाण्याच्या प्रस्तावावर चर्चा झाली. श्रद्धाळू नागरिकांच्या मागणीनुसार हे प्रवेशद्वार उभावावे याकडे गुप्ता यांनी लक्ष वेधले. त्यावर बांधकाम सभापती जितेंद्र पंचबुद्धे यांच्यासह सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली आणि प्रवेशद्वार उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. त्यासाठी ९.४५ लाखांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. हा प्रस्ताव अशोक गुप्ता यांनी मांडून त्याला विष्णू नागरीकर यांनी अनुमोदन दिले.
३४ विषयांना आमसभेची मंजुरी
By admin | Published: August 10, 2016 11:59 PM