गोंदिया : मागील वर्षभरापासून सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असून, याचा परिणाम रक्तदान शिबिरांवरसुद्धा झाला आहे. परिणामी, रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने गरजूंना रक्त मिळणे कठीण झाले. नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनने याची दखल घेत विविध संघटनांच्या मदतीने २३ मार्च रोजी शहीद दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील आठही तालुक्यांत रक्तदान शिबिरांचे आयोजन केले होते. यात शिबिरांत एकूण ३६१ रक्तदात्यांनी रक्तदान करून शहिदांना श्रद्धांजली वाहिली.
निमा संघटनेच्या पुढाकारामुळे गरजूंना वेळीच रक्त मिळण्यास मदत होणार आहे. सध्या सर्वत्र कोविड लसीकरण सुरू आहे. लसीकरण केल्यानंतर २८ दिवसांपर्यंत रक्तदान करता येणार नसल्याने रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. तर कोरोनामुळे रक्तदान शिबिरांवरसुद्धा परिणाम झाला आहे. त्यामुळेच शासकीय रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मात्र, ‘निमा’सारख्या संघटनेने घेतलेल्या पुढाकारामुळे गरजू रुग्णांना मदत होणार आहे. गोंदिया येथे २४, गोरेगाव ५२, सडक अर्जुनी १४०, अर्जुनी मोरगाव १०० आणि तिरोडा येथे ४० रक्तदात्यांनी रक्तदान केले. शिबिरासाठी अध्यक्ष डॉ. उल्हास गाडेगोणे, सचिव डॉ. रोशन देशमुख, डॉ. कल्याणी खोब्रागडे, डॉ. हरिश अग्रवाल, डॉ. विवेक पराते, डॉ. हेमंत गौतम, डॉ. शिवकुमार बावणे, डाॅ. रुस्तम येडे, डॉ. एन.एस. तूरकर, डॉ. विवेक मेश्राम, डॉ. रमेश कापगते, डॉ. रमेश चांडक, डॉ. दुर्वास शेंडे, डॉ. विकेश दुबे, डॉ. भूषण रहांगडाले, डॉ. देवाशंकर पटले, डॉ. सुशील रहांगडाले यांनी सहकार्य केले.