नरेश रहिले गोंदिया शहरातील कचरा गोळा करून उदरनिर्वाह करणाऱ्या, नदीतील रेतीतून सोने किंवा छोट्यामोठ्या वस्तू शोधणाऱ्या, रेल्वेत भीक मागणाऱ्या, मांग गारूडी, पेंढारी व शाळाबाह्य ३८६ बालकांना त्यांचा मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यात आणखी १० बाल संक्रमण शाळा सुरू करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे ‘त्या’ ३८६ बालकांच्या त्यांचा हक्क मिळणार असून त्यांच्या जीवनाला कलाटणी मिळणार आहे. बाल कामगारांना ताब्यात घेऊन त्यांना शाळेत टाकून मोकळे होण्याचे काम अनेक जिल्ह्यात होत असते. परंतु गोंदिया जिल्ह्याने बालकामगारांसंदर्भात नेहमी चांगली भावना ठेवून त्यांना चांगले नागरिक घडविण्याचा प्रयत्न गोंदिया जिल्हा प्रशासनाने केला आहे. जिल्ह्यात हजारावर बालमजूर असले तरी शासनाकडे फक्त १९६ जणांची नोंद आहे. या बालमजूरांसाठी सालेकसा, अदासी, काचेवानी, मुंडीकोटा, घोगरा (भीमनगर) या पाच ठिकाणी बाल संक्रमण शाळा उघडण्यात आल्या आहेत. गोंदिया जिल्ह्यात ज्या ठिकाणी बालकामगार आढळू शकतात अशा १० ठिकाणचे सर्वेक्षण जिल्हा प्रशासनाने ४ सप्टेंबर २०१५ रोजी केले. प्रभारी कामगार उपायुक्त उज्वल लोया, सहाय्यक कामगार अधिकारी बोरकर, जिल्हाधिकारी कार्यालयाचे कर्मचारी व १३ आशा स्वयंसेविकांनी सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणात ३८६ बालमजूर आढळले. त्या बालकांना त्यांचा मूलभूत हक्क मिळावा यासाठी जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी तत्परता दाखवून या बालकांसाठी शासनाच्या १० संक्रमण शाळा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. त्या शाळा लवकर सुरू होण्यासाठी राष्ट्रीय बालकल्याण समितीमार्फत प्रयत्न केले जात आहेत. जिल्हाधिकारी या समितीचे अध्यक्ष असतात. बालकामगारांची संख्या संपुष्टात यावी यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे प्रयत्न केले जात आहेत.
३८६ बालकांना मिळणार हक्काची छाया
By admin | Published: November 20, 2015 2:15 AM