गोंदिया : देशात कोरोनाला टक्कर देण्यासाठी लसीकरण जोमात असून आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्स सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिकांना लस दिली जात आहे. अशात जिल्ह्यत आतापर्यंत २४,९६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून यामध्ये ३९३७ नागरिकांचा दुसरा डोसही घेऊन झाला आहे. यामुळे आता ते ‘सेफ झोन’मध्ये आले आहेत असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढू लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा राज्यात खळबळ माजली असून कित्येक जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन केले जात आहे. मात्र आता कोरोना विरोधात लढण्यासाठी लस आली असून देशात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे, लसीकरणाची सुरुवात आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्कर्सला प्राधान्य देत करण्यात आली. मात्र आता कोरोनाचा वाढता धोका बघता ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यासाठी शहरातील ५ खासगी रुग्णालयातही लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे.
कोरोनासाठी देण्यात येणारी ही लस अत्यंत प्रभावी असल्याचे सांगितले जात असतानाच या लसीचे २ डोस घेणे गरजेचे आहे. २ डाेस घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोनाशी लढणाऱ्या एंटीबॉडीज तयार होतात असा तो फॉर्म्युला आहे. अशात जिल्ह्यात आतापर्यंत ३,९३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस घेतल्यानंतर २८ दिवसांनी त्यांना दुसरा डोस घ्यायचा असल्याने दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे. मात्र कोरोना लसीकरण जिल्ह्यात जोमात सुरू असल्याने लवकरच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण होणार यात शंका नाही.
-------------------------
आतापर्यंत २४९६६ नागरिकांचे लसीकरण
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला सुरुवात झाल्यापासून बुधवारपर्यंत २४,९६६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. यामध्ये २१,०२९ नागरिकांचा पहिला डोस झाला असून ३,९३७ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. यात, केटीएस व बीजीडब्ल्यू रुग्णालयात ८,०५३, उपजिल्हा रुग्णालयात २,६५१, ग्रामीण रुग्णालयात ११,४९९ तर प्राथमिक आरोग्य केंद्रात २,७६३ नागिकांनी लस घेतली आहे.
--------------------
भीती न बाळगता लस घ्या
नागरिकात कोरोना लसीला घेऊन आजही प्रमाणात शंका निर्माण झालेल्या आहेत. मात्र कोरोनाची लस अत्यंत सुरक्षित व प्रभावी असल्याने नागरिकांनी लस घेणे गरजेचे आहे. कोरोना विरोधात लढण्यासाठी भारताकडे लस हे शस्त्र तयार असून लसीमुळेच कोरोनापासून सुरक्षा करता येणार आहे. करिता नागरिकांनी लसीला घेऊन कसलीही भीती न बाळगता लसीकरण करवून घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाकडून केले जात आहे.