पालकमंत्री, आमदारांचे प्रयत्न : कालव्याचे बांधकाम विस्तार व सुधारणा होणारगोंदिया : राज्य शासनाच्या जयलसंपदा विभागाने जिल्ह्यातील बाघ इटियाडोह प्रकल्पाच्या डाव्या कालव्यावरील २७ किलोमीटरदरम्यान शिल्लक असलेले मातीकाम, बांधकाम विस्तार व सुधारणा करण्याच्या कामाला प्रशासकीय मान्यता प्रदान केली आहे. यासाठी ३ कोटी ९९ लाख ५३ हजार रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या निधीसाठी पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच आ.गोपालदास अग्रवाल यांनीही त्यासंदर्भात मागणी केली होती.बाघ प्रकल्पाचे बांधकाम १९७० मध्ये पूर्ण करण्यात आले असून या धरणाची एकूण उपयुक्त साठवण क्षमता ३६८.९६ दलघमी आहे. आंतरराज्य करारानुसार पाण्याचा वाटा महाराष्ट्र व मध्य प्रदेश यांच्यात ३:१ असा आहे. प्रकल्पाच्या डाव्या कालव्याची एकूण लांबी ६५ किलोमिटर असून उजव्या मुख्य कालव्याची लांबी ६४.५० किलोमीटर आहे. प्रकल्पाच्या कालवे प्रणालीची एकूण लांबी ४५० किलोमीटर असून त्यावर लहान-मोठी १ हजार ८९६ बांधकामे आहेत. या प्रकल्पाद्वारे गोंदिया जिल्ह्यात आमगाव, गोंदिया व सालेकसा तालुक्यातील ३५ हजार ७१८ हेक्टर क्षेत्राला सिंचन होते. प्रकल्पाच्या कालव्याचे बांधकाम ४५ वर्षापूर्वीचे असल्याने त्यावरील बांधकामे जीर्णावस्थेत असून बहुतांश बांधकाम पूर्णत: किंवा अंशत: क्षतिग्रस्त झाली आहेत. त्यामुळे कालव्यातील पाण्याला पाझर फुटले आहेत. पाण्याची गळती रोखण्यासाठी अनेक कामे हाती घेणे गरजेचे झाले होते.यासंदर्भात कालव्याच्या संकल्पीत काटछेदाप्रमाणे पुन:स्थापित करणे व निवडक आवश्यक ठिकाणी पाच टक्के लांबीमध्ये अस्तरीकरणाचा प्रस्ताव, तसेच अंशत: क्षतिग्रस्त बांधकामाची दुरुस्ती आणि पूर्णत: क्षतिग्रस्त बांधकामाच्या पुनर्बांधणीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. विशेष म्हणजे पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाने १ एप्रिल रोजी एक अध्यादेश काढून सदर कामाकरिता व त्यासाठी आवश्यक ३९९.५३ लक्ष रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे कालव्याची उपरोक्त कामे पूर्ण झाल्यावर १ हजार १५५ हेक्टर क्षेत्र पुन:स्थापित होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
‘बाघ’च्या डाव्या कालव्यासाठी ३.९९ कोटी रुपयांचा निधी
By admin | Published: April 11, 2016 1:59 AM