विजय मानकर
सालेकसा : वाघ पाटबंधारे व्यवस्थापन उपविभाग आमगाव अंतर्गत वाघ जलाशयातून शेतीसाठी पाण्याचा वापर करणाऱ्या आमगाव, सालेकसा आणि देवरी तालुक्यातील शेतकऱ्यांवर एकूण ४ कोटी १४ लाख २१ हजार रुपयांची पाणीपट्टी थकीत आहे. पाटबंधारे विभाग डबघाईस आला असून, कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीअभावी त्यांची दुर्दशा झाली आहे.
शासन कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक योजना राबवित असून, त्यावर कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च करीत आहे. मात्र, दुसरीकडे शेतकऱ्यांना सिंचनासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे दुुर्लक्ष करीत आहे. पाटबंधारे विभागाला निधी मिळत नसल्याने हा विभागच पूर्ण डबघाईस आला आहे. शेतकऱ्यांवरील पाणीपट्टीच्या थकीत रकमेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे या विभागाला कालव्याच्या देखभाल दुरुस्तीची कामे करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कार्यालयाचे वीज बिल भरण्यासाठीसुद्धा या विभागाकडे निधी नसल्याची बाब पुढे आली आहे. वाघ पाटबंधारे उपविभागांतर्गत सिरपूर, कालीसरार आणि पुजारीटोला धरणाचे पाणी कालव्याद्वारे आमगाव, देवरी, सालेकसासह गोंदिया तालुका आणि लगतच्या मध्यप्रदेशातील शेतीलासुद्धा सिंचन म्हणून वापरले जाते. पुजारीटोला धरणातून शून्य ते २९ किलोमीटर डावा कालवा आणि शून्य ते ३३ किमी उजवा कालव्याची व्यवस्था आहे. दोन्ही कालव्यांद्वारे एकूण ९५०० हेक्टर शेतीला खरीप आणि रब्बी हंगामात पाणी दिले जाते. पाटबंधारे विभागाकडून १९८१-८२ पासून पाणीपट्टी आकारली जात असून, सुरुवातीला अतिशय अल्प स्वरूपाची रक्कम आकारली जात होती. परंतु, आता त्यात वाढ करण्यात आली आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामात प्रतिहेक्टर ४१५ रुपये आणि रब्बी हंगामासाठी १२३० रु. प्रतिहेक्टरप्रमाणे पाणीपट्टी आकारली जात आहे. मोटार पंपाद्वारे शेतात सिंचन करण्यासाठी खरीप हंगामात ८३ रुपये आणि रब्बी हंगामात ३२४ रुपये प्रतिहेक्टरप्रमाणे आकारले जाते.
..........
पाणीपट्टीच्या थकीत रकमेत वाढ
मागील काही वर्षांपासून पाणीपट्टी वसुली सक्तीने केली जात नसून, लाभार्थी शेतकरीसुद्धा पाणीपट्टी भरण्यास गांभीर्याने घेत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर अनेक वर्षांची पाणीपट्टी थकीत असून, त्यात वाढ होत आहे. आमगाव शाखेंतर्गत १ कोटी ८० लाख ३८ हजार रुपये, सालेकसा शाखेंअंतर्गत १ कोटी ८० लाख ९६ हजार रुपये आणि पुजारीटोला शाखेंतर्गत ५२ लाख ८७ हजार रुपये शेतकऱ्यांवर थकीत आहेत.
..........
पाणीपट्टी वसुलीसाठी धडक मोहीम
पाणीपट्टी वसुली होत नसल्याने या विभागाकडे निधीची समस्या आहे. जलाशयांची देखरेख दुरुस्ती तसेच कालव्याची दुरुस्ती योग्य प्रमाणात करणे कठिण झाले आहे. त्यामुळे ठिकठिकाणी कालवे फुटले आहेत. त्यातून पाणी वाया जाते. शेवटपर्यंत शेतात सिंचन होत नाही. कालवा दुरुस्तीसाठी शासनाकडे निधीची मागणी केली असता पाणीपट्टी वसुलीचे प्रमाण किती आहे हे विचारले जाते. यंदा विभागाने घरोघरी जाऊन पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू केली होती. तेव्हा साडेतीन लाख रुपये जमा झाले.
.........
कोट
पाणीपट्टी गोळा करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्याची गरज आहे. यंदा विभागाने शेतकऱ्यांना त्यांच्या गावी जाऊन समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु, मनुष्यबळ कमी असल्याने मोहीम पूर्णपणे यशस्वी करता आली नाही. तरीसुद्धा समजदार शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.
प्रियम शुभम, उपविभागीय अभियंता वाघ पाटबंधारे विभाग
.....
धरणाच्या पाण्याचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांनी दरवर्षी पाणीपट्टी देऊन विभागाला सहकार्य करण्याची गरज असून, यामुळे येणाऱ्या काळात प्रत्येकाला शेतीला पुरेशा प्रमाणात पाणी मिळू शकेल.
-रामदास दमाहे, शेतकरी कावरा बांध