गोंदिया : जिल्ह्यात कोरोना विषयक अधिसूचना पारित करण्यात आली असून त्यांचे उल्लंघन करणाऱ्या ४ हॉटेल्सला शुक्रवारी (दि.९) सील करण्यात आले आहे. नगर परिषदेच्या पथकाने ही कारवाई केली असून येत्या १५ दिवसांपर्यंत हे हॉटेल्स सील राहणार आहेत.
राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता राज्य शासनाने निर्बंध लावून दिले आहेत. त्यानुसार, हॉटेल्समध्ये ग्राहकांना बसवून त्यांना खाद्यपदार्थ देता येणार नसून फक्त पार्सलची सवलत देण्यात आली आहे. तरिही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन सुरूच असून अशाच ४ हॉटेल्सला दणका देत नगर परिषदेच्या पथकाने शुक्रवारी (दि.९) सील ठोकले आहे. यामध्ये राजपुरोहीत स्वीट मार्ट, मॉ वैष्णवी रेस्टॉरंट, न्यू दिल्ली हॉटेल व रावण दहन मैदान येथील कुल्फी सेंटरचा समावेश आहे. नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली असून हे हॉटेल्स पुढील १५ दिवस सील राहणार आहेत.