गोंदिया विभागात प्रथम : मार्चपर्यंत सुरू राहणार काम गोंदिया : रेशनमध्ये होणारा काळाबाजार थांबविण्यासाठी शासनाने आधार लिंकिंग करणे सुरू केले. या उपक्रमाला जिल्ह्यात प्रतिसाद चांगला मिळाला असून गोंदिया जिल्हा नागपूर विभागात या कामात प्रथम क्रमांकावर तर राज्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील चार दिवसात नागपूर विभागात ६९ हजार १२८ कुटुंबियांनी आपली आधार लिंकिंग केली आहे. त्यात गोंदिया जिल्ह्यातील ४१७१ कुटूंब आहेत.राज्यात ५ कोटी ९२ लाख १६ हजार ३१ कुटूंबांपैकी ३ कोटी ८४ लाख १७ हजार ४१३ कुटूंबांनी २८ डिसेंबरपर्यंत आधार लिंकिंग केले आहे. १ ते ४ जानेवारीदरम्यान ७ लाख २३ हजार ९८१ कुटूंबांनी आधार लिंकिंग केले. ४ जानेवारीपर्यंत नागपूर विभागात ५५ लाख १६ हजार ७७८ कुटूंबातील ७४ लाख ६२ हजार ५९३ लोकांचे आधार लिंकिंग झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात २ लाख ८१ हजार ९७९ कुटूंबांकडे रेशन कार्ड आहेत. यामध्ये अंत्योदयचे ७५ हजार ८८२, बीपीएलचे १ लाख ११ हजार ४९६, एपीएलचे (केशरी) ८६ हजार ८४७ तर पांढऱ्या ७ हजार ७५४ रेशन कार्डधारकांचा समावेश आहे. जिल्ह्यात १० लाख ९० हजार २५९ लोकांकडे रेशन कार्ड आहे. त्यापैकी ९ लाख ३५ हजार ७५४ लोकांचे आधार लिंकिंग करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. हे उद्दीष्ट ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करायचे होते. परंतु २८ डिसेंबरपर्यंत ७ लाख ११ हजार ३८५ लोकांनी आपले आधार लिंकिंग केले. नवीन वर्षाच्या चार दिवसात ४ हजार १७१ लोकांनी आधार लिंकिंग केले आहे.या लिकिंगमुळे रेशनची सबसिडी थेट बँकेत जमा होण्यासोबतच यात होणारा काळाबाजार थांबणार आहे. (तालुका प्रतिनिधी)
चार दिवसात ४१७१ कुटुंबांची आधार लिंकिंग
By admin | Published: January 08, 2016 2:22 AM