जिल्ह्यात धानाचे सर्वाधिक उत्पादन घेतले जात असून, यामुळेच जिल्ह्याला धानाचे कोठार म्हटले जाते. येथील शेतकरी रबी व खरीप हंगामात धानाचे पीक प्रामुख्याने घेतो. यंदाही शेतकऱ्यांनी मागील वर्षातील पावसाच्या जोरावर रबीत धानाचे पीक घेतले. रबीतील धानाची कापणी व मळणी जोरावर सुरू असून, आता खरीप हंगाम तोंडावर आला आहे. ७ जूनपासून मान्सून लागणार असून, आता पाऊस कधीही हजेरी लावू शकतो. यामुळे शेतकरी रबीतील धानाची लवकरात लवकर खरेदी व्हावी अशी मागणी करीत आहे.
रबीतील धान विकल्यानंतर हाती आलेल्या पैशांतून खरिपाचे नियोजन करता येणार असल्याने शेतकऱ्यांची रबीतील धान खरेदीसाठी धावपळ सुरू आहे. दरवर्षी जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून सर्वाधिक धान खरेदी केली जात असून, यासाठी १०५ आधारभूत धान खरेदी केंद्रे सुरू केली जातात. मात्र, यंदा धान खरेदी केंद्रे सुरू करण्यास उशीर झाल्याचे दिसते. कारण, आतापर्यंत फक्त ४२ केंद्रेच सुरू झाली आहेत. अशात लवकरात लवकर केंद्र सुरू करून धान खरेदी झाल्यास शेतकऱ्यांना खरिपाचे नियोजन करता येणार.
--------------------------
सर्वाधिक केंद्रे उघडली गोंदिया तालुक्यात
मार्केटिंग फेडरेशनची शुक्रवारपर्यंत (दि.२८) जिल्ह्यात ४२ केंद्रे उघडली होती. यामध्ये सर्वाधिक १५ धान खरेदी केंद्रे गोंदिया तालुक्यातील आहेत, तर सर्वांत कमी प्रत्येकी २ धान खरेदी केंद्रे तिरोडा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात उघडण्यात आली आहेत. यामुळे आता खरीप हंगाम बघता उर्वरित केंद्र लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
------------------------------
तालुकानिहाय उघडण्यात आलेली धान खरेदी केंद्रे
तालुका केंद्रे
गोंदिया १५
गोरेगाव ९
तिरोडा २
आमगाव ५
सालेकसा ४
सडक-अर्जुनी ५
अर्जुनी-मोरगाव २
एकूण ४२